पुणे-पालिका निवडणुकीसाठी वॉर्डरचनेची कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट आणि गणांच्या आखणीबाबत अद्यापही राज्य निवडणूक आयोगाकडून आदेश आलेले नाहीत. त्यामुळे याकडे जिल्ह्यात उत्सुकता आहे.
दरम्यान, पालिकेत 23 गावे समाविष्ट झाल्याने हवेलीमधील चार जिल्हा परिषद, तर सहा पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. पण, तरी लोकसंख्येचा निकषावर जिल्हा परिषदेमधील गट व पंचायत समित्यांचे गणांची संख्या तेवढीच म्हणजे अनुक्रमे 75 आणि 150 राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुढील वर्षी पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहे. पालिका निवडणुकीसाठी वॉर्ड रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. गट आणि गणांमध्ये कोणत्या गावांचा समावेश होतो. यानुसार इच्छुकांची मोर्चेबांधणी होते.
गट आणि गणांची रचना तयार करण्याचे अधिकार प्रांताधिकारी यांना असतात. त्यांनी केलेल्या रचना मान्यतेसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवितात. यावर हरकती नोंदविण्याची संधी दिले जाते. हरकतींच्या सुनावनीनंतर विभागीय आयुक्त गट आणि गण रचना अंतिम करतात.
मुळशी आणि हवेलीमधील एकूण 23 गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. गट अथवा गणांमधील पूर्णत: गावे पालिकेत समाविष्ट झाली आहेत, अशांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यानुसार सध्यस्थितीत जिल्हा परिषदेचे चार सदस्यांचे पद रद्द झाले आहे. असे असले तरी जिल्हा परिषद मधील सदस्यांची संख्येमध्ये बदल होणार नसून हवेली मधील गट लोकसंख्येच्या निकषावर इतर तालुक्यात वर्ग करण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर तालुक्यातील जिल्हा परिषदेची संख्या वाढू शकते.
याच निकषांनुसार हवेलीमधील पंचायत समिती सदस्यांची संख्या कमी होणार आहे. मात्र, इतर तालुक्यांतील गणांची संख्या वाढणार आहे. तर, एकूण गणांची संख्या 150 ही कायम राहणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.