हडपसर विधानसभा मतदारसंघात घेणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या भेटीगाठी
हडपसर (विवेकानंद काटमोरे) : मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी पार्थ पवारांना राजकारणात लाँच करण्याचा प्रयत्न केला मात्र लोकसभेला पार्थ यांचा सपाटून पराभव झाला.त्यानंतर गेली दीड-दोन वर्ष पार्थ पवारांच्या रिलाँचिंगची तयारी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यातील बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघ अधिक सोपा व सोयीचा असल्याची चर्चा असल्याने त्यांच्यासाठी शिरूर लोकसभेचीही गेले काही महिन्यांपासून चाचपणी सुरू आहे. मंगळवारी पार्थ पवार हे हडपसर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांचे शिरूर लोकसभेमधूनच रीलॉन्चिंग होणार ? असेच चित्र दिसत आहे.
कधी मावळ तर कधी शिरूर लोकसभेसाठी पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. परंतु, मावळच्या पराभवानंतर पार्थ यांच्या राजकारणातल्या एंट्रीसाठी अजित पवारांनी सुकर आणि सुरक्षित मार्ग निवडण्याची तयारी सुरू केली आहे, असेच चित्र गेले काही दिवस दिसत आहे. दोन आडवड्यापूर्वी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज देऊन अजित पवारांनी हडपसर मतदार संघातील जाहीर व खासगी कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा सपाटा लावला आहे.त्यात आता मंगळवारी ( दि.९) पार्थ अजित पवार हे हडपसर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका व नगरसेवक यांची त्यांच्या निवासस्थानी व जनसंपर्क कार्यालयात भेट घेणार आहोत.यावरून पार्थ पवार यांचे शिरूर लोकसभा मतदार संघातूनच रिलाँचिंगची होणार, असेच चित्र सध्या तरी दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघातून खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याची गर्जना करत दोन आठवड्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हडपसर मतदारसंघात मांजरी बुद्रुक येथे हजेरी लावत येथील विकासकामांचा आढावा घेतला. येथे येण्याच्या एक दिवस अगोदर अमोल कोल्हे यांना ओपन चँलेंज दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजितदादा शिरुर लोकसभा मतदारसंघात धडकल्याने साहजिकच त्यांच्या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती.त्याचवेळी खासदार डॉ. कोल्हे यांच्या समोर महायुतीचा उमेदवार कोण? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, महायुतीचा काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार आमचाच होणार, अशी खात्री व्यक्त करत अजितदादांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते.
आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीला महायुती एकत्रित सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले.एकीकडे अजित पवार हे पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील,असे सांगत आहेत,तर दुसरीकडे पार्थ पवारांनी शिरूर लोकसभेतील हडपसर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन येथील उमेदवारी बाबत चाचणी सुरू केली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांचे शिरूर लोकसभेतूनच रीलॉन्चिंग होणार असेच म्हणावे लागेल.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागा.
शिरूर लोकसभेला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असो किंवा महायुतीचा त्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा, असे आदेश अजित पवारांनी हडपसर मध्ये गेल्या दोन आठवड्यात झालेल्या जाहीर कार्यक्रमातून दिले आहेत. महायुतीच्या वतीनेच निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असंही अजित पवार वेळोवेळी म्हणाले.परंतु, पार्थ पवारांनी हडपसर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात करून शिरूर लोकसभेवर आपला दावा निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर, महायुतीकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.
शिरूर लोकसभेतील भोसरी आणि हडपसर विधानसभा मतदार संघ हे मताधिक्य मिळवण्यासाठी अतिशय महत्वाचे मानले जातात. त्यामुळेच की काय पार्थ पवारांनी हडपसर विधानसभा मतदार संघातूनच पदाधिकारी ,माजी नगरसेवक व नगरसेवकांच्या निवासस्थानी व जनसंपर्क कार्यालयात भेटीगाठीचा दौरा मंगळवारी (दि.९) सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आखला आहे.
हडपसर मतदार संघात पार्थ पवार घेणार यांच्या भेटीगाठी
पार्थ पवार हे सकाळी नऊ वाजता माजी नगरसेवक बंडूतात्या गायकवाड यांच्या निवासस्थानी (मुंढवा) ,पुढे माजी नगरसेविका सुरेखा कवडे यांच्या निवासस्थानी (बी.टी. कॅवडे रोड) ,माजी नगरसेवक आण्णा म्हस्के यांच्या निवासस्थानी (भीमनगर),माजी नगरसेवक शिवाजी पवार यांच्या निवासस्थानी (१५ नंबर सोलापूर रोड कॅनोल जवळ),माजी महापौर वैशाली बनकर यांच्या निवासस्थानी (सातववाडी), माजी नगरसेवक योगेश ससाणे यांच्या जनसंपर्क कार्यालय (ससाणेनगर) माजी नगरसेवक आनंद आलकुंटे यांच्या जनसंपर्क कार्यालय (शंकर मठ, वैदुवाडी),माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालय (रामटेकडी), माजी नगरसेवक फारुकभाई इनामदार यांच्या निवासस्थानी (सय्यदनगर), येथे तर शेवटी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर विधानसभा कार्याध्यक्ष संदीप बधे यांच्या निवासस्थानी( कोंढवा) जाऊन भेटीगाठी घेणार आहोत.