पुणे –शहराध्यक्ष घेतात तीच पक्षाची अधिकृत भूमिका आहे. शहराध्यक्ष एकटे निर्णय घेत नाहीत, कार्यकारिणीशी चर्चा करूनच पक्षाची पालिकेतील भूमिका ठरवतात. शहराच्या विकासात राजकारण न आणता एकमेकांना सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताचे असेल, त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल. मात्र, काही चुकीचे घडत असेल, कुठे पाणी मुरत असेल त्यास सहकार्य करणार नाही, अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट केली.
पुणे महापालिकेत भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीबाबत पवार यांनी ही भूमिका मांडली. पालिकेतील स्थायी समितीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या निविदांच्या निर्णयाला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत सीसीटीव्ही तपासून पाहण्याच्या शहराध्यक्षांच्या भूमिकेवर विचारले असता पवार म्हणाले की, एखादा नगरसेवक चुकीचा वागत असल्यास त्याची शहानिशा करून घेणे काम आहे.
याबाबत वेगळा अर्थ काढू नका असेही पवार यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
माजी महापौरांचा राष्ट्रवादीत प्रवेश…
महापालिका निवडणूकांच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेशांची मालिका सुरूच असून शुक्रवारी माजी महापौर व ज्येष्ठ नेते शांतिलाल सूरतवाला, माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे, माजी नगरसेविका वैजयंती पासलकर, राजाभाऊ पासलकर, रमेश भांड आणि सलीम शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, ज्येष्ठ गायक व पक्षाचे नेते आनंद शिंदे, प्रदीप गारटकर उपस्थित होते.
स्थायी समिती सदस्यांची केली कानउघडणी…
महापालिकेत ठेकेदारी पद्धतीने सुरक्षारक्षक नेमण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका माहीत असताना केलेली ही चूक अक्षम्य आहे. यापुढे अशा प्रकारची चूक खपवून घेतली जाणार नाही. पक्षाच्या धेय्य-धोरणांना काळिमा लागेल, असे वर्तन करू नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थायी समिती सदस्यांची कानउघडणी केली.
पालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना परस्पर भूमिका किंवा निर्णय घेऊ नये. पक्षाची भूमिका कायम ठेवावी. वर्तमानपत्र वाचत जावा. पक्षाच्या शहर पातळीवरील नेत्यांशी चर्चा करा. विरोधी पक्षनेत्या आणि शहराध्यक्ष देतील ते आदेश पाळा अशा शब्दात अजित पवार यांनी या सदस्यांची कानउघडणी केली.