पुण्याला मिळणार आणखी 50 मिडीबसेस

मध्यवर्ती भागांसाठी बसची खरेदी;  स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनास पत्र

पुणे – शहराच्या मध्यवर्ती व्यापारी पेठांमध्ये “अटल बस सेवा’ सेवा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका आणखी 50 मिडीबसेसची खरेदी करणार आहे. 2020-21 आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात 25 कोटी रुपयांची तरतूद असून, यातून या बसेस खरेदी करण्याचे पत्र स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी महापालिका प्रशासनास दिले आहे.

 

पालिका प्रशासनाने या बस खरेदीसाठी कंपन्यांकडून दर मागवले आहेत. यात प्रतिबस 25 लाख रुपयांचे दर कंपन्यांनी कळवले आहेत. त्यानुसार 12.50 कोटी रुपयांच्या बस खरेदीचा प्रस्ताव वाहन विभागाने तयार केला आहे. लवकरच तो स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागांतील रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे या भागात सातत्याने वर्दळ असते. या भागात चारचाकी तसेच दुचाकींच्या पार्किंगसाठी जागेची अडचण आहे.

 

त्यामुळे ग्राहकांना परिसरात वाहने लावून खरेदीस जाण्यासाठी वेळेत बस मिळाल्यास अडचण दूर होणार आहेत. त्यातच, पीएमपीने ‘अटल’ ही पाच रुपयांत पाच किलोमीटरची बस सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गतच मध्यवस्तीत या मिडी बसेस उपयुक्त ठरणार आहेत. त्यावर रासने यांनी 25 पर्यंत आसन क्षमतेच्या तसेच पर्यावरणपूरक सीएनजी बसेस घेण्याचे पत्र दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने बस खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे.

 

 

करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या खर्चास मर्यादा आली आहे. त्यामुळे प्रशासनाने हा प्रस्ताव आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या वित्तीय नियोजन समितीसमोर ठेवला असून, समितीच्या मान्यतेनंतरच ही खरेदी होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.