पुणे – मराठी भाषेच्या संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना मराठी विषय घेऊ दिले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर विद्यापीठ प्रशासनने चौकशी समिती स्थापन केली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, संबंधित अहवाल अधिष्ठाता मंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे धाडस विद्यापीठ करणार का, हेच आता पाहावे लागणार आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. असे असताना विद्यापीठ संलग्न असलेल्या शिक्रापूर येथील कस्तुरी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात मराठी भाषेचा अहवेलना केली जात असल्याचे विद्यार्थ्यांची तक्रार आहे, तसेच याबाबत एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित महाविद्यालयावर कारवाई करावी, असा स्थगन प्रस्ताव अधिसभा सदस्य दादाभाऊ शिनलकर यांनी अधिसभेसमोर सादर केला होता. त्यावर आधिसभेत सदस्यांनी मनोगत व्यक्त केले.
पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना पूर्ण वेळ प्राचार्य नाहीत, तसेच पूर्णवेळ प्राध्यापकही नाहीत, अशा अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशा महाविद्यालयांची संलग्नता रद्द करावी, अशी मागणी दादाभाऊ शिनलकर यांनी केली. या चर्चेत हर्ष गायकवाड यांनीही सहभाग घेतला.
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांची तक्रार प्राप्त झाली होती. त्याची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने समिती नेमली होती. समितीचा अहवाल विद्यापीठाकडे प्राप्त झाला असून, तो अधिष्ठाता मंडळासमोर ठेवून त्यावर चर्चा केली जाईल, तसेच विद्यापीठ कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही केली जाईल.” – कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी
संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मराठी विषय घेऊ न देणे, ही गंभीर बाब आहे. या महाविद्यालयाची संलग्नता रद्द करावी आणि कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी दिला आहे.