पुणे : धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. घटस्फोटासाठी दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने नोटीस बजावूनही पती न्यायालयात हजर राहिला नाही. त्यामुळे न्यायालयाने पत्नीच्या बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर एकतर्फी घटस्फोट मंजुर केला आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी.डी.कदम यांनी याबाबत आदेश दिला.
राजा आणि राणी (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. दोघांचा प्रेमविवाह झाला आहे. तो व्यावसायिक चालक आहे. तर ती गृहिणी आहे. तिच्या वतीने ॲड. सचिनकुमार गेलडा यांनी न्यायालयात काम पाहिले. २०१३ मध्ये दोघांचा विवाह झाला. लहानपणापासून तो मावशीचा घरी राहत होता. त्यामुळे त्याने तिला नांदायला मावशीच्या घरी नेले.
सुरूवातीला काही दिवस सुरळीत गेले. त्यानंतर मावशी आणि तिचे खटके उडू लागेले. त्यानंतर दोघे भाड्याने खोली घेऊन राहू लागले. त्याला मद्याचे व्यसन होते. तो पैशासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असे. मात्र, ती त्रास सहन करत असे.
दरम्यान त्यांना दोन मुले झाली. मात्र, त्याच्या स्वभावात फरक पडला नाही. परिणामी, ती माहेरी निघून गेली. त्यानंतर तिच्या बहिणीचा हळदी समारंभ होता. तिथे त्याने मद्य प्राशन करून दंगा केला. याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली. मात्र, पोलिसांनी समजावल्यावर व्यवस्थित राहण्याची हमी त्याने दिली. ती माहेरीच राहत होती. मार्च २०२२ मध्ये तो तिथे गेला. धरदार शस्त्राने हात, मानेवर वार केला. तसेच पोटात हत्यार भोकसून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. तो जेलमध्ये होता. दरम्यान त्याच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
“पतीने पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. तसेच तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या त्रासाला कंटाळून तिने घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता. न्यायालयाने नोटीस बजावूनही तो हजर राहिला नाही. त्यामुळे न्यायालयाने एकतर्फी घटस्फोट मंजुर केला. महिला पक्षकाराला न्याय मिळवून दिल्याचा आनंद वाटत आहे.” – ॲड. सचिनकुमार गेलडा, पत्नीचे वकील.