पुणे : शहर आणि परिसरात गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी संपूर्ण विभागातील आरोग्य यंत्रणांचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये करण्यात येणारे उपचार आणि उपाययोजना यांचा समावेश होता. विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीला जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. एच.डी. प्रसाद उपस्थित होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, साथरोग विभागाच्या सहसंचालक बबिता कमलापूरकर, अन्न – औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त, मनपा पाणी पुरवठा विभागाचे नंदकुमार जगताप दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
ज्या भागात, कॉलनीत रुग्ण आढळून येत आहेत, तेथील पाण्याचे स्रोत महापालिकेने तपासावेत आणि नागरिकांना पिण्याचे स्वच्छ आणि सुरक्षित पाणी उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी. रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा अभ्यास करावा; जेणेकरून हा आजार नेमका कशामुळे होतोय याची माहिती समोर येईल आणि नागरिकांना त्याबाबत सजग करता येईल, अशा सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.
आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि महापालिकेचा आरोग्य विभाग यांनी समन्वय ठेवून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, असेही त्यांनी सर्व यंत्रणांना सांगितले.