पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे चार दिवसांनी सेवानिवृत्त होत आहे. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार कुलगुरूपद रिक्त होताच, चारही अधिष्ठाता आणि प्र-कुलगुरूपदाचा कार्यभार संपुष्टात येणार आहे. मात्र व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्या परिषद, परीक्षा मंडळ सदस्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्टपर्यंत आहे. दरम्यान, नवे कुलगुरू कोण? अशी चर्चा विद्यापीठ परिसरात आहे.
डॉ. करमळकर हे दि. 17 मे रोजी निवृत्त होत आहे. त्यानंतर हे पद रिक्त होणार आहे. त्याच दिवशी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, अधिष्ठाता संजीव सोनवणे, मनोहर चासकर, पराग काळकर, अंजली कुरणे यांचा कार्यकाल संपुष्टात येणार आहे. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या सदस्यपदी उशिरा नियुक्ती झाल्याने त्यांचा कार्यकाल आणि अधिकार आणखी तीन महिने अबाधित राहणार आहे. राज्य शासन आणि राज्यपाल यांच्या वादात कुलगुरू निवडीसंदर्भातील विद्यापीठ कायद्यातील सुधारणा विधेयकावर काहीच निर्णय होऊ शकलेला नाही.
तर, “नव्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर पुणे कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे,’ असे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे पदभार अन्य विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे आता विद्यापीठाचा कारभार प्रभारी कुलगुरूंवर चालणार असल्याचे स्पष्ट होत आहे.