हडपसर – पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर या ठिकाणी मोठी वर्दळ वाढली आहे. त्यामुळे हा महामार्ग ओलांडणे धोकादायक ठरत आहे. हडपसर आकाशवाणीजवळ टेकवडे पेट्रोल पंपासमोर एक इंग्रजी माध्यमाची खासगी शाळा असल्याने पालकांना धोकादायकरित्या हा रस्ता ओलांडत पाल्यांना शाळेत सोडणे तसेच नेण्यासाठी यावे लागते.
यात ज्येष्ठ पालकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे येथे स्काय वॉकची निर्मिती झाल्यास पादचाऱ्यांना वर्दळीचा रस्ता ओलांडणे सुरक्षित होईल. संभाव्य अपघाताच्या घटना टाळता येतील. अशी मागणी पालकांसह स्थानिक नागरिकांनीही केली असून अपघात झाल्यास कोण जबाबदार. असा सावलही केला आहे.
रविदर्शन ते लक्ष्मी कॉलनी दरम्यान पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडण्याऱ्या पादचाऱ्यांची संख्या मोठी आहे. लक्ष्मी कॉलनी, पंधरा नंबर आणि रविदर्शन चौकात सिग्नल असल्याने तेथून रस्ता ओलांडणे शक्य आहे. मात्र, रविदर्शन ते मांजरी फाटा पंधरा नंबर पर्यंत एकही चौक किंवा पंक्चर किंवा पादचारी मार्ग नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी, पालक आणि नोकरदार यांना दुभाजकावरून उड्या मारत महामार्ग ओलांडावा लागत आहे. येथे खासगी शाळा आहेत. हॉस्पिटल आहे. एसटी बस थांबा आहे.
यामुळे पादचाऱ्यांची नेहेमीच ये-जा सुरू राहते. हडपसर आकाशवाणी व टेकवडे पेट्रोल पंपासमोर काही विद्यार्थी रस्ता ओलांडण्यासाठी थांबतात. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही वाहतूक कमी झाली नाही तरी काही विद्यार्थी जीव धोक्यात घालून हा महामार्ग ओलांडतात. यातून मोठ्या अपघाताचा धोका आहे त्यामुळे येथे स्काय वॉक किंवा फूट ओव्हरब्रीज उभारण्यात यावा, अशी मागणी होत आहे.