पुणे – कॉंग्रेस उमेदवारांची यादी दिली कुणी?

माजी आमदार आणि मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा सवाल; राहुल गांधींकडे दाद मागणार

पुणे – पुणे शहर लोकसभा मतदार संघातून प्रदेश कॉंग्रेस समितीकडे जी तीन नावे परस्पर पाठवण्यात आली ती नावे आणि यादी कोणी निश्‍चित केली? हा निर्णय परस्पर आणि गुपचूप कसा घेतला गेला? असे प्रश्‍न माजी आमदार आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी उपस्थित केले आहेत. या संदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे शिवरकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

माजी मंत्री शिवरकर हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असून ते लोकसभेचे इच्छुक उमेदवार आहेत. आपण पक्षाचे निष्ठावान अनुयायी असून, गेली पाच दशके पुण्यात कॉंग्रेस बांधणीत हयात घालवली आहे. नगरसेवक, महापौर, शहराध्यक्ष, आमदार आणि मंत्री अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. या अनुभवाच्या आणि ज्येष्ठतेच्या पार्श्‍वभूमीवर लोकसभेसाठी दावा केला होता. मात्र यादीतून नाव गाळण्याचा प्रकार जाणूनबुजून करण्यात आल्याचा आरोप शिवरकर यांनी केला आहे. स्वत:हून माघार घेतल्याचेही पसरवले गेले आहे. तसे नसल्याचे या आधीच मी स्पष्ट केले आहे. तसेच पुण्यातील कॉंग्रेस उमेदवारीसाठी आपला दावा कायम असल्याचेही शिवरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील लोकसभेसाठी कॉंग्रेसचा उमेदवार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या जागेसाठी अभय छाजेड, अरविंद शिंदे, मोहन जोशी आदींची नावे चर्चेत आहेत. वास्तविक पाहता यापूर्वीच माजी आमदार शिवरकर यांनी आपली लोकसभेची मनीषा बोलून दाखवली होती. मात्र, त्याची शहर किंवा राज्य पातळीवर दखल घेण्यात आली नाही. कॉंग्रेसचे जुने निष्ठावंत या नात्याने त्यांचा खासदार पदावर दावा आहे व तो रास्त आहे, असे त्यांच्या कार्यकर्त्याने बोलताना सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here