फुरसुंगी (महादेव जाधव) –पुणे महानगरपालिका सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते व पुढाऱ्यांना आरक्षण व प्रभाग रचना केव्हा जाहीर होणार याची उत्सुकता लागली होती; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून प्रभाग रचना काही केल्या जाहीर होत नसली तरी विद्यमानांसह, नवे उमेदवार “तिकिटा’साठी आपापल्या पक्षाकडे पाठपुरावा करीत असून “गॉडफादर’च्या मध्यमातून “फिलिंडग’ लावत आहेत.
करोना वाढती रुग्णसंख्या, ओबीसी आरक्षण यामुळे आगामी पालिका निवडणुका वेळेत होणार की पुढे जाणार, याबाबत संभ्रम असला तरी आपण कोठेही कमी पडायला नको, याची काळजी आजी-माजीसह इच्छुक उमेदवार घेत आहेत. निवडणूक आरोगाकडून प्रभाग रचना व निवडणूक तारखा केव्हाही जाहीर होऊ शकतील, या अंदाजावर अनेकांनी “हात ढिला’ सोडला असून समाविष्ट 23 गावांसह प्रत्येक प्रभागात नव्या योजना, उपक्रमांची जोरदार राबविले जात आहेत.
पक्षाचे “लेबल’ नसलेले….
कोणत्याही पक्षाचे “लेबल’ नसलेले अनेक इच्छुक उमेदवार आपण निवडणूक लढणार नसल्याचे वरवर सांगत असले तरी पडद्यामागून त्यांच्या हालचाली सुरू आहेत. “प्रथम नगरसेवक’ होण्याचा मान मिळवण्यासाठी मिळेल त्या पक्षाकडून तिकीट मिळवून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाचे “लेबल’ नसलेल्या इच्छुक उमेदवारांना सर्वच पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी जुळवून घ्यावे लागत असून प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावावी लागत आहे. विशेष, म्हणजे पक्षाचे वरिष्ठ अशांनाच कार्यक्रमाचा खर्च करायला लावत आहेत.
अंदाज बांधणे अशक्य…
महापालिकेत जाण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून प्रभागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी “वजनदार’ इच्छुकालाच प्रत्येक पक्षाकडून तिकीट दिले जाऊ शकते. याच कारणातून गायब असणारे अनेक अनोळखी चेहरे सध्या फ्लेक्सवर झळकळत आहेत. प्रभाग व तारखा जाहीर होत नसल्यान तरी प्रत्येक जण प्रकाश झोतामध्ये राहण्यासाठी प्रयत्न करीत असला तरी निवडणुकीबाबत कोणताही अंदाज आताच बांधणे शक्य होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
कच्चा आराखडा आणि…
पूर्व हवेली तालुक्यातील समाविष्ट गावांतील सर्वच पक्षांचे इच्छुक उमेवार जाहीरपणे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. प्रत्येकाने आपापल्या सोयीप्रमाणे प्रभाग होईल, या अपेक्षेने फुरसुंगी गावचा एक स्वतंत्र प्रभाग व उरुळी देवाची, हांडेवाडी, होळकरवाडी, उंड्री, पिसोळी, येवलेवाडी या गावांचा एक प्रभाग होणार, असे गृहीत धरून मतदारांशी संपर्क साधण्याचे काम सुरू केले होते. परंतु, कच्चा आराखडा मात्र वेगळाच असल्याने इच्छुक उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.