पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई उपनगरीय रेल्वेत प्रवास करण्याची मुभा दिली. पुणे जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने हीच मार्गदर्शक तत्वे शहरात लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ओळखपत्र देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
यानंतर प्रवाशांना मासिक सिझन तिकीट देण्यात येणार असल्याचे पुणे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे पासेसचा चेंडू जिल्हा प्रशासनाच्या कोर्टात आहे. त्यामुळे प्रश्न रेल्वेचा असला, तरी “लोकल’ पातळीवर समन्वय नसल्याने प्रवासी मात्र वैतागले आहेत.
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या, दुसऱ्या डोसनंतर 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना राज्य सरकारने लोकलने प्रवासाची मुभा दिली. या निर्णयाची अंमलबजावणी शहरात आणि जिल्ह्याच्या हद्दीत होणार असल्याच्या सूचनादेखील पालिका आणि जिल्हा प्रशासनाने दिल्या.
पहिल्या टप्प्यात मुंबईत ही सेवा सुरू झाली असून, यासाठी नागरिकांना विशेष पासेस देण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात देखील पासेस देणे आवश्यक आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने पासेस द्यावेत आणि त्यानंतर संबंधित प्रवाशांना तिकीटे देण्यात येतील, असा भूमिका रेल्वे प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केली. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून पासेस वितरणाची यंत्रणा अद्याप जाहीर केली नाही.
“कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आणि दुसऱ्या डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना पुणे-लोणावळा लोकलमधून प्रवास करण्यासाठी ओळखपत्र द्यावे. त्यानंतर पासेस असणाऱ्या संबंधित नागरिकांना मासिक सीझन तिकीट रेल्वेकडून देण्यात येणार आहे,’ अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात यावी.