पुणे – पीएमपी कामगारांना कधी कायम करणार?

10 ते 12 वर्षांपासून 2 हजार 700हून अधिक कामकार प्रतिक्षेत

पुणे – कामगार कायद्यानुसार 6 महिन्यांत कामगारांना कायम करणे आवश्‍यक असतानाही प्रशासनाने त्यांना तब्बल 10 ते 12 वर्षांपासून या लाभापासून वंचित ठेवले आहे. कामगारांना प्रशासनाने कोलदांडा दाखविला असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे कामगार हतबल झाले असून आता न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे.

पीएमपीएमएल प्रशासनामध्ये वाहक, चालक, क्‍लिनर आणि स्विपर ही महत्त्वाची पदे आहेत. त्यापैकी वाहक आणि चालकांचा मार्गावर प्रत्यक्षात प्रवाशांशी संबंध येत असतो. तसेच क्‍लिनर आणि स्विपर हे वर्कशॉपशी संबंधित पदे आहेत. कोणत्याही शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थेमध्ये अथवा आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना पहिल्या टप्प्यात “प्रोबेशन’ वर कामाला घेण्याची पद्धत आहे. त्याचे दोन पिरियड संपल्यानंतर संबंधित कामगाराला 6 महिन्याच्या आत कायमस्वरूपी केलेच पाहिजे, असा नियम कामगार कायद्यामध्ये आहे. मात्र, पीएमपीएमएल प्रशासनाने गेल्या 10 ते 12 वर्षांपासून प्रशासनातील तब्बल 2 हजार 700हून अधिक कामगारांना या लाभापासून वंचित ठेवले आहे.

या कामगारांना प्रशासनाने कायम केल्यास त्यांच्यावर प्रशासनाला किमान 55 ते 60 लाखांचा खर्च वाढणार आहे. मात्र, हे वास्तव असतानाच प्रशासनाने दीडशे कार्यशाळेतील सेवकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वर्ग केले आहे. त्यामुळे त्यांचे वेतन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने देण्यात येत आहे. परिणामी त्यांच्या वेतनावर होणाऱ्या 70 ते 80 लाख रुपयांच्या खर्चाची बचत झाली आहे. रोजंदारीवरील कामगारांना कायम करण्यात यावे यासाठी पीएमटी कामगार संघाच्या (इंटक) वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. त्याशिवाय उपोषणाचे शस्त्रही उगारण्यात आले होते. त्यावेळी 5 मार्चपर्यंत या कामगारांना सेवेत कायम करण्यात येईल, असे आश्‍वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने यासंदर्भात इंटकचा आणि कामगारांचा विश्‍वासघात केला आहे, असे इंटकचे अध्यक्ष राजेंद्र खराडे यांनी “प्रभात’ शी बोलताना सांगितले. यासंदर्भात पीएमपीएमएलच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.