पुणे : दुबार विक्री ही मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, कांदा, बटाटा आणि लसूण विभागाला लागलेला कलंक आहे. यामुळे शेतीमालाला भाव कमी मिळतोच. मात्र, ग्राहकालाही चढ्या भावाने खरेदी करावी लागते. ही दुबार विक्री वर्षानुवर्षे सुरू आहे. विषय चर्चेत आल्यानंतर तात्पुरती कारवाई होते. मात्र, पुन्हा सत्र सुरू होते. आता बाजार समिती प्रशासन दुबार विक्री बंद करण्यासाठी सरसावले आहे. मात्र, ही कारवाई कायमस्वरूपाची ठरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मार्केट यार्डात आडतदारांपेक्षा डमींची संख्या जास्त आहे. मिळेल त्या ठिकाणी, गाळ्यावर भाड्याने जागा घेऊन हे डमी व्यवसाय करतात. सध्या कांदा, बटाटा, लसूण विभागांत दुबार विक्री बंद करण्याचे परिपत्रकही काढले आहे. तेथील दुबार विक्री बंद झाली आहे. मात्र, भाजीपाला आणि फळ विभागात दुबार विक्री सुरूच आहे. यावर आगामी काळात बाजार समिती बंदी आणणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
काय आहे दुबार विक्री?
मार्केट यार्डात जिल्ह्यासह विभागातील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी आणतात. आडतदार या मालाची विक्री करतात. डमी आडते कमी किमतीत हा शेतीमाल खरेदी करतात आणि तो किरकोळ स्वरूपात जास्त भावाने विक्री करतात. कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान आणि ग्राहकांना आर्थिक फटका बसतो. डमी आडते मात्र मधल्या मध्ये पैसे कमवून गब्बर होतात.
कारवाईचा दिखावा तर नाही ना
कांदा, बटाटा विभागामध्ये पूर्वी डमी आडत्यांची पद्धत नव्हती. मात्र, या १० वर्षांत ती रुढ झाली आहे. या विभागात १०० ते २०० डमी असतील. मात्र, फळे, भाजीपाला विभागात हजारोच्या संख्येने डमी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी थोड्या असलेल्या कांदा- बटाटा विभागात हा कारवाईचा दिखावा तर केला नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
कांदा, बटाटा, विभागात दुबार विक्री बंद केली आहे. तेथून खरेदी करून भाजीपाला विभागात विक्री करण्यासही मनाई केली आहे. भाजीपाला, फळ विभागांतही लवकरच दुबार विक्री बंद करून हा प्रश्न कायमचा मार्गी लावला जाईल.
– डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे बाजार समिती.सभापती, सचिव, संचालक मंडळाच्या आदेशानुसार कांदा, बटाटा, लसूण विभागांत दुबार विक्री पूर्णपणे बंद केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
– बाळासाहेब कोंडे, फळ, भाजीपाला विभागप्रमुख, पुणे बाजार समिती