पुणे – हेल्मेट वापराचे शहाणपण कधी?

मे महिन्यात 17 जणांचा अपघाती मृत्यू : 11 जण विनाहेल्मेट

पुणे – दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनसंख्येबरोबर अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. केवळ मे महिन्यामध्ये 17 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यापैकी 11 जणांचा मृत्यू हेल्मेट न घातल्याने झाला. वाढते शहरीकरण आणि लोकसंख्येप्रमाणे वाहनांची संख्या वाढत आहे. शहर आणि परिसरामध्ये पाच महिन्यांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये सुमारे

86 जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर 180 जण गंभीर जखमी आणि 52 जण किरकोळ जखमी झाले आहेत. भरधाव वेगात वाहन चालवणे, हेल्मेट न वापरणे, नियमांचे पालन न करणे आदी कारणांमुळे अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ होताना दिसत आहे. या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर, अपघात रोखण्यासाठी हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा बडगा वाहतूक विभागाने उगारला आहे.

मे महिन्यामध्ये झालेल्या अपघातांमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 11 जणांचा हेल्मेट न घातल्याने तर एका व्यक्‍तीचा हेल्मेट घालून देखील मृत्यू झाला. त्याचबरोबर पाच पादचाऱ्यांचा देखील मृत्यू झाला. तर 31 जण गंभीर जखमी झाले. वाहतूक विभागाकडून हेल्मेट वापरण्यासंदर्भात वाहनचालकांना वारंवार आवाहन करण्यात येते. स्वत:च्या सुरक्षिततेचा विचार करून वाहनचालकांनी हेल्मेट वापरणे आवश्‍यक आहे.
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्‍त, वाहतूक

पोलिसांकडून वारंवार आवाहन
हेल्मेट वापरण्यासंदर्भात अनेकदा वाहतूक विभागाकडून वाहनचालकांना आवाहन करण्यात येत आहे. फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल मीडियाद्वारे पोलिसांकडून हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, वाहनचालकांची परिस्थिती “जैसे थे’ असल्याचे चित्र शहरामध्ये दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.