ऐनवेळच्या निमंत्रणावर नाराजी; उरुळी कचरा डेपो समन्वय समितीची बैठक रद्द
पुणे – उरुळी देवाची येथील कचरा डेपो समस्यांबाबत महापालिकेने नेमलेल्या मॉनिटरिंग कमिटीची (देखभाल व नियंत्रण समिती) बैठक गुरुवारी रद्द करण्यात आली.
प्रशासनाने या समितीच्या सदस्यांना बैठकीपूर्वी कोणतीही माहिती दिली नाही, तसेच बैठकीचे निमंत्रणही आयत्या वेळी व्हॉट्स ऍपवर निमंत्रण पाठवल्याची नाराजी व्यक्त करत समितीतील “कचरा डेपो बंद आंदोलन’च्या सदस्यांनी याचा निषेध करत बैठक तहकूब केली. तसेच या बाबतचे पत्रही समितीकडून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांना देत नाराजी व्यक्त केली.
उरुळी देवाची येथील कचरा डेपो बंद करण्याचे आदेश आहेत. तसेच या प्रकरणी केवळ कचरा प्रक्रिया प्रकल्पातून निघणाऱ्या रिजेक्ट वर बायोमायनिंग करण्यास “एनजीटी’ने परवानगी दिली आहे. मात्र, या ठिकाणी दररोज निर्माण होणारा कचरा महापालिका प्रशासन बायोमायनिंगमध्ये टाकत असल्याचा आरोप आंदोलन समितीने वारंवार केला आहे.
तसेच याबाबत पुरावेही समोर आणले आहेत. पालिकेकडून केले जाणारे हे प्रकार तातडीने थांबविण्याची मागणीदेखील आंदोलकांनी केली आहे. त्यानंतर ग्रामस्थांच्या मागण्या तसेच पालिकेच्या कामांमध्ये समन्वय असावा, यासाठी महापालिकेने समिती नेमली आहे.
या समितीची बैठक घनकचरा व्यवस्थापन विभागाने गुरुवारी बोलवली होती. मात्र, याचे लेखी निमंत्रण न पाठवता प्रशासनाने बैठकीचे निमंत्रण व्हॉट्स ऍपवर पाठवले. मात्र, समितीची स्थापना करताना प्रत्येक बैठकीपूर्वी पूर्वी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त, होणाऱ्या बैठकीचा अजेंडा सदस्यांना देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच मागील बैठकीत झालेल्या निर्णय या बैठकीपूर्वी पूर्ण करण्यात येणार होते.
मात्र, या पैकी कोणत्याही बाबीची पूर्तता बैठकीवेळी करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर समितीच्या सदस्यांनी ही बैठक तहकूब करण्याची मागणी केली. तसेच या बाबतचे निवेदन अतिरिक्त आयुक्तांना दिले. समन्वय समितीचे दिलीप मेहता, संजय हरपळे, भगवान भाडळे, विजय भाडळे, अनंत भाडळे, डॉ. बाळासाहेब हरपळे, रणजीत रासकर यावेळी उपस्थित होते.