दहीहंडीनंतर ठिकठिकाणी अस्वच्छता
सुट्टीच्या दिवशी स्वच्छतेला हरताळ
पुणे – स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत शहर स्वच्छतेसाठी कंबर कसलेल्या महापालिकेला सुट्टीच्या दिवशी कचऱ्याचे नियोजनच करता येत नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात कचरा साठत आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी शहर स्वच्छतेलाच सुट्टी दिली जात आहे.
शहर स्वच्छता तसेच दैनंदिन झाडणकामांसाठी महापालिकेचे आणि ठेकेदारांचे कर्मचारी असे जवळपास आठ ते दहा हजार जणांची फौज नियमित स्वच्छतेसाठी रस्त्यावर येते. मात्र, प्रशासन आठवडाभर चांगले काम करत असताना सुट्टीच्या दिवशी कचरा व्यवस्थापनासाठी काहीच केले जात नसल्याचे गेल्या महिनाभरापासून कचरा वाढला आहे.
ऑगस्टमध्ये प्रत्येक शनिवार आणि रविवारी महापालिकेस सार्वजनिक सुट्टी आली त्यात चार रविवार तसेच पाच शनिवारांचा समावेश मात्र, या सर्वच दिवशी शहरात कचऱ्याचे ढीग साचले. सुट्टीच्या दिवशी फक्त 25 टक्के स्वच्छता कामगार कामावर असतात. मात्र, त्यांचीही प्रामुख्याने मार्केटयार्ड तसेच कचरा निर्माण होऊ शकतो अशाच ठिकाणी नियुक्ती केली जाते. त्यामुळे सलग सुट्टीत सलग दोन दिवस शहराचे झाडणकाम होत नसल्याने रस्त्यांवर कचरा साठल्याचे चित्र आहे.