Pune Weather Update – शहरासह जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे थंडीचा जोर ओसरला असून, दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव पहायला मिळत आहे. रविवारी (दि. २५) एनडीए परिसरात सर्वात कमी १२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असून, पाषाण, शिवाजीनगर, कात्रज, धायरी, वारजे, खडकवासला आणि हवेली परिसरात पारा १२ ते १३ अंशाच्या आसपास असल्यामुळे पहाटे आणि रात्री हलकीसी थंडी जाणवत आहे. कोरेगाव पार्क, मगरपट्टा, हडपसर, विश्रांतवाडी परिसरातील किमान तापमान १५ ते १७ अंशाच्या पुढे गेल्यामुळे या परिसरातील थंडी गायब झाली असून, दिवसभर उन्हामुळे काहीशा उकाडा जाणवत आहे.गेल्या ४८ तासात हवामानातील बदलामुळे शहरातील कमाल-किमान तापमानात एक ते दीड अंशाने वाढ झाली आहे. दिवसभर ऊन आणि दुपारनंतर ढगाळ वातावरणामुळे काही भागात पावसाची शक्यता वाटत होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिली असून, ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत होता. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील. पहाटे धुके तर दिवसभर ऊन्हाचा चटका जाणवेल. दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. रविवारी सकाळी एनडीए येथे १२, शिवाजीनगर परिसरात १३.२, पाषाण येथे १३.३, लोहगावमध्ये १६.५, चिंचवड येथे १७, कोरेगाव पार्क येथे १७.१ तर मगरपट्टा परिसरात १८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.