Pune: कात्रज परिसरात पाणीपुरवठा ठप्प; दोन दिवसांपासून नागरिकांची तारांबळ

कात्रज – कात्रज गावठाण, अंजनी नगर, संतोष नगर, दत्तनगर, धनकवडी, बालाजी नगर भागामध्ये शुक्रवार, शनिवार पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. घरातील कामे करणे, स्वच्छता राखणे अशा सर्वच गोष्टींसाठी मोठी अडचण निर्माण होत असताना मोठी तारांबळ उडाली आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत गुरुवारी (दि.२२) क्लोजर दिला होता. त्यानंतर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे कळवले होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत गुरुवारी क्लोजर देण्यात आल्यानंतरही अंतर्गत मेंटेनन्स कामे सुरू होती. पाणीपुरवठा विभागामार्फत मेंटेनेसची कामे उशिरा केल्याने व त्यानंतर तपासणी न केल्याने त्यात त्रुटी राहिल्या त्यामुळे शुक्रवारी (दि.२३) देखील पाणीपुरवठा विस्कळीत राहिला, पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठा खंडित होऊन नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
कात्रज येथील राजीव गांधी पंपिंग स्टेशन येथे गुरुवारी (दि. २२) संध्याकाळी पाणीपुरवठा विभागामार्फत फुटलेल्या पाइपचे काम संध्याकाळी उशिरा सुरू करण्यात आले तसेच शनिवारी पंपिंग स्टेशन येथील बटरफ्लाय मोटर खराब झाल्याने देखील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. यामुळे शनिवारी संध्याकाळी कात्रज अंजनीनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.
“राजीव गांधी पंपिंग स्टेशन येथे मेंटेनेस कामांतर्गत फुटलेला पाइप व बटरफ्लाय मोटर खराब झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. संतोष नगर भागामध्ये शनिवारी सकाळी पाणीपुरवठा केला गेला, त्यानंतर उर्वरित भागामध्ये संध्याकाळी पाणीपुरवठा सुरळीत केला.” – संदीप मिसाळ, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग.





