पुणे – खडकवासला धरण प्रकल्पात पाणीसाठा २४ टीएमसीवर गेला आहे. तसेच खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत ही धरणे सरासरी ८२ टक्के भरली आहेत. धरण परिसरांत आणखीही पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन दिवसांत धरणाच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे खडकवासला धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे धरणातून विसर्ग करावा लागला आहे. परिणामी शहराच्या काही भागांत पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. दरम्यान, खडकवासला धरण परिसरात पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग बंद करण्यात आला आहे.
गतवर्षी ह्याच दिवशी चारही धरणाचा पाणीसाठा २० टीएमसी होता. यावर्षी हा साठा २४ टीएमसी इतका आहे. खडकवासला धरण ६९ टक्के भरले असून, यातील पाणीसाठा १.२६ टीएमसी इतका आहे. त्याचप्रमाणे पानशेत धरण ९२ टक्के भरले असून, यातील पाणीसाठा ९.८७ टीएमसी आहे. तसेच, वरसगाव धरणात पाणीसाठा १० टीएमसी असून, हे धरण ७८ टक्के इतके भरले आहे. टेमघर धरण ७५ टक्के भरले असून, पाणीसाठा २.३२ टीएमसी इतका आहे.