पुणे : पाणी वाटपाला वादाच्या उकळ्या!

कोणत्याही निर्णयाविना झाली कालवा सल्लागार समितीची बैठक


पुणे शहर आणि ग्रामीण भागालाही हवे आहे वाढीव पाणी

पुणे – भामा-आसखेड धरणातील 2.67 टीएमसी पाणी शहरालर मिळणार आहे. त्यामुळे खडकवासला प्रकल्पातून शिल्लक राहणारे 2.67 टीएमसी पाणी शेतीसाठी मिळावे, अशी मागणी ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी केली. तर, महापालिकेत नव्याने 23 गावे समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे हे पाणी पुणे शहराला मिळावे, अशी मागणी शहरातील लोकप्रतिनिधींनी कालवा समितीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

शहरी व ग्रामीण भागातून या अतिरिक्त ठरणाऱ्या पाण्याची मागणी होऊ लागल्याने कालवा समितीच्या बैठकीत पाणी वाटपाचा निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे खडकवासला धरणातील पाणी वाटपाचे नियोजन करण्यासाठी येत्या सोमवारी पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.

नवीन शासकीय विश्रामगृह येथे कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह पाटबंधारे अधिकारी उपस्थित होते. हद्दीलगतच्या पाच किलोमीटरपर्यंतच्या भागात महापालिकेलाच पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे पुणे शहरासाठी पाण्याचा कोटा वाढविण्यात यावा, व हे खडकवासला धरणातून पाणी कमी करण्यात यावे, अशी मागणी शहरी भागातील लोकप्रतिनिधींनी केली. गळती रोखण्यासाठी कालवा दुरुस्त करावा, शहरातील पाणीगळती रोखावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाला करण्यात आली.

पाटबंधारे विभागाचे नियोजन…
खडकवासला प्रकल्पात सध्या 23.18 टीएमसी पाणीसाठा आहे. यातील 2.25 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होईल. त्यामुळे शेतीसाठी व पिण्यासाठी 20.93 टीएमसी इतके पाणी शिल्लक राहणार आहे. पुणे महापालिका हद्दीत 15 जुलै 2021 पर्यंत 1,460 एमएलडी प्रमाणे 9.18 टीएमसी पाण्याची आवश्‍यकता आहे. दौंड नगरपालिका व ग्रामीण भागात पिण्यासाठी 0.85 टीएमसी असे एकूण 10.90 टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. तर सिंचनासाठी 10.90 टीएमसी पाणी वाटपाचे नियोजन असल्याचे पाटबंधारे विभागाकडून मांडण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.