Pune Water Cut : तातडीच्या देखभाल दुरूस्तीसाठी महापालिकेने गुरूवारी ( दि. २९ ) भामा-आसखेड जलकेंद्र वगळता इतर सर्व जलकेंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे भामा-आसखेड जलकेंद्रावरून होणारा पाणी पुरवठा वगळता उर्वरीत सर्व पाणी पुरवठा बंद असणार आहे. बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणी बंद राहणार असून शुक्रवारी ( दि.३०) रोजी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. या दुरुस्तीअंतर्गत पर्वती नवीन व जुने जलशुद्धीकरण केंद्र, पर्वती एमएलआर, एचएलआर व एलएलआर टाक्या, पर्वती टँक पॉइंट, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर, चिंचवली, वारजे जलकेंद्र तसेच वडगाव जलकेंद्राशी संबंधित टाक्या व पंपिंग यंत्रणांची देखभाल केली जाणार आहे. पाणी बंद असलेला भाग पर्वती एमएलआर टाकीअंतर्गत गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, सोमवारी पेठ, घोरपडे पेठ, कात्रज गेट, लोहियानगर, अर्जुन बेडे स्टेडियम परिसर, पर्वती दर्शन तसेच मुंढवा रस्त्याचा काही भाग याठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही. पर्वती एचएलआर टाकी परिसरात सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, लोअर व अपर इंदिरानगर, शिवदर्शन, बिबवेवाडी गावठाण, औंधकरनगर, गंगाधाम, शेलार मळा, टिळक वसाहत, पर्वती गावठाण, मितानगर, कुमार पृथ्वी आणि कोंढवा खुर्दचा काही भाग प्रभावित होणार आहे. पर्वती एलएमआर टाकीअंतर्गत सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर व स्वारगेट परिसरात दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वडगाव जलकेंद्राशी संबंधित हिंगणे, आनंदनगर, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव खुर्द व बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगरचा काही भाग, टिळकनगर आणि दाते वसाहत या भागांनाही फटका बसणार आहे. राजीव गांधी पंपिंग स्टेशनअंतर्गत संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव खुर्द-बुद्रुक, बाणेर सिटी, मोझा, श्रीहरी टाकी, बालाजीनगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर, राजस, उन्नत व सुंदरवन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, धनकवडी, जुना प्रभात ३५ व ४५ विभाग तसेच येवलेवाडी परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. लष्कर ते खराडी पंपिंग बंद ठेवण्यात येणार असल्याने खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, इऑन आयटी पार्क परिसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, धनेकर नगर, यशवंतनगर, चंदननगर, सुनीतानगर, धर्मनगर, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, महादेवनगर, माळवाडी आणि मनोहर सोसायटी याठिकाणीही पाणीपुरवठा होणार नाही. तसेच लष्कर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, गांधी भवन, पंचकाई क्लब, जीएसआर टाकी, शिवणे इंडस्ट्रीज, एसएनडीटी, एएलआर, चतु:शृंगी टाकी, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल तसेच खडकवासला-नांदेड बुस्टर पंपिंगअंतर्गत येणाऱ्या भागांवरही या बंदचा परिणाम जाणवणार आहे.त्यात कोथरूड, औंध, बाणेर, बालेवाडी, वारजे कर्वेनगर, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, शिवाजीनगर, माॅडेल काॅलनी, गोखले नगर या परिसराचाही समावेश आहे.