प्रभागनिहाय नकाशांचा पालिकेला पडला विसर
पुणे – निवडणूक आयोगाने प्रभाग जाहीर करण्यासाठी दिलेली मुदत चार दिवस शिल्लक असतानाही पालिका प्रशासनाने शुक्रवारी रात्री घाई गडबडीत प्रभाग रचनेचा संपूर्ण शहराचा एकच नकाशा तसेच प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर केली. मात्र, प्रत्येक प्रभागाचा नकाशा जाहीर करण्याचा विसर प्रशासनाला पडल्याने प्रभागात नेमका कोणता भाग कमी केला आणि कोणता वाढविला याचा अंदाज घेण्यातच इच्छुकांची तारांबळ उडली आहे.
अंतिम प्रभाग रचनेत प्रशासनाने केवळ एकच नकाशा जाहीर केला. तो आणि अधिसूचनेमधून ज्या 32 प्रभागांमध्ये महापालिकेने बदल केले आहेत. त्या प्रभागांच्या नावे आणि लोकसंख्येव्यतिरिक्त काहीच स्पष्ट होत नाही. विशेष म्हणजे पालिकेने प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, प्रारूप प्रभाग रचनेप्रमाणे असे नकाशेच महापालिकेने जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे नेमका कोणता भाग वगळण्यात आला आणि कोणता वाढविण्यात आला, याबाबत सर्वसामान्य नागरिक तसेच निवडणूक लढविणे इच्छूकही अनभिज्ञच आहे. अर्धवट प्रभाग रचना जाहीर केल्याने महापालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
तीन दिवसांची प्रतीक्षा
इच्छुकांना वॉर्डनिहाय प्रभाग रचनेचे नकाशे पाहण्यासाठी चार दिवसांची प्रतिक्षा सहन करावी लागणार आहे. शनिवार व रविवार महापालिका बंद आहे. तर सोमवारी महापालिकेस बुद्धपौर्णिमेची सुट्टी आहे. त्यामुळे हे काम प्रशासनाकडून मंगळवारी हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी आधी आयोगाच्या संकेतस्थळावरून हे नकाशे डाऊनलोड केले जाणार असून त्यानंतर ते पालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड केले जाणार आहेत. त्यामुळे हे नकाशे मंगळवारी संध्याकाळीच नागरिकांना तसेच इच्छुकांना पाहता येणार आहेत. त्यानंतरच प्रभागात झालेले प्रत्यक्ष बदल निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार झाले आहेत, की राजकीय हस्तक्षेपाने? हे स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.