पुणे – महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर होण्याकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांची प्रतीक्षा आणखी ताणली जाणार आहे. निवडणूक आयोगाने हा प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याच्या सूचना दिलेल्या असल्या तरी या कालावधीत हे काम पूर्ण करणे शक्य नसल्याने पुणे महापालिकेने प्रभाग रचनेसाठी 15 दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे ही मागणी मान्य झाल्यास प्रभाग रचना आणखी दोन आठवडे लांबणीवर पडणार आहे. तर, महापालिकेस मुदतवाढ मिळाल्यास प्रभाग रचना अंतिम होण्यास जानेवारी 2022 उजाडण्याची शक्यता आहे.
विद्यमान महापालिकेची मुदत 14 मार्च 2022 ला संपत आहे. त्यामुळे आगामी वर्षात फेब्रुवारी 2022 मध्ये महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता असून त्यासाठी कच्चा प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका असलेल्या महापालिकांना देण्यात आलेल्या आहेत. त्यात, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महापालिकांतील प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा सादर करण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत दिली होती.
मात्र, त्याचवेळी राज्य शासनाकडून 2021 ची जनगणना अंतिम झालेली नसल्याने कायद्यात बदल करून महापालिकांसाठीची सदस्यांची कमाल आणि किमान संख्या वाढविली आहे. तर, पुणे महापालिकेत नव्याने 23 गावांचा समावेश झाला असून त्यानुसार महापालिकेस संपूर्ण प्रभाग रचना नवीन हद्दीच्या समावेशासह करावी लागणार आहे. परिणामी या कामासाठी महापालिका प्रशासनास वेळ लागणार असून प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा पाठविण्यासाठी अवघा आठवड्याचा कालावधी राहिलेला असला तरी पालिकेकडून हे काम पूर्ण झालेले नाही तसेच ते पूर्ण होणेही शक्य नाही.
त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगास पत्र पाठवून प्रभाग रचनेसाठी 15 दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेने प्रभाग रचनेचा आराखडा सादर केल्यानंतर प्रभाग रचना आणि आरक्षणांच्या सोडतीवर हरकती सूचना मागविण्यात येतील. या हरकती, सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.
असे आहे संभाव्य चित्र
प्रभागांची संख्या 58
तीन सदस्यीय प्रभाग 57
दोन सदस्यीय प्रभाग 1