पुणे – करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये शहरात कडक संचारबंदी लागू आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसावा म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. नाकाबंदीत बाहेर पडलेल्या नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे. यामध्ये विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तिंबरोबरच काही समाज विघातक व्यक्तीही पोलिसांच्या हाती लागत आहे.
समर्थ पोलिसांना अशाच प्रकारे नाकाबंदी दरम्यान एक वॉण्टेंड गुन्हेगार जाळ्यात सापडला. बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल गुन्हयात तो वॉण्टेड होता. त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी बंडगार्डन पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले आहे. प्रेम कानडे (25, रा.हिंगणे मळा,हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने एसटी बस चालकाच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन जखमी केले होते. त्याच्यासह त्याच्या मित्रांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. तर प्रफुल्ल वाघमारे (22, रा.कसबा पेठ) हा समर्थ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
समर्थ पोलिसांनी दिलेल्य माहितीनूसार करोनाच्या अनुषंगाने केईएम रुग्णालयासमोर नाकाबंदी लावण्यात आली होती. या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, पोलीस हवालदार रणजीत उबाळे, पोलीस नाईक प्रमोद जगताप, स्मिता सिताप, लक्ष्मी चौधरी, पोलीस शिपाई निलेश साबळे, सुमीत खुट्टे, प्रियंका खराडे हे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी तैनात होते. त्यांना पॉवरहाऊस चौकाकडून एका दुचाकीवर डबलशीट बिना मास्क घातलेल्या दोन व्यक्ती दिसल्या. त्यांना थांबवले असता, त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात गाडी एका गुन्हयात जप्त होती.
न्यायालयाच्या आदेशानूसार ती ताब्यात घेऊन घरी जात आहे. प्रक्रिया करण्यास उशीर झाला असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर पोलीस शिपाई निलेश साबळे व सुमित खुट्टे यांना संशय आला. त्यांनी दोघांचीही कसून चौकशी केली. त्यांच्या दुचाकीला नंबर प्लेटही नव्हती. याचीही माहिती घेण्यात आली. चौकशी दरम्यान दोघांची नावे प्रेम कानडे व प्रफुल्ल वाघमारे असल्याचे समजले. यातील प्रेम कानडे हा वॉण्टेड असल्याचे समजताच दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही विनामास्क फिरत असल्याने 500 रुपये दंड आकारण्यात आला. तर प्रेम कानडेला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.ही कामगिरी उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त मालोजीराव पाटील, पोलीस निरीक्षक उल्हास कदम व उपनिरीक्षक विशाल मोहिते यांच्या पथकाने केली.