पुणे – पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ९१ ज्येष्ठ नागरिक व सहा दिव्यांग अशा एकूण ९७ मतदारांच्या गृह मतदानासाठी आठ पथकांची नियुक्ती करण्यात आली असून दि.१४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसांत गृह मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिली.
गृह मतदान पथकामध्ये एक मतदान अधिकारी, एक इतर अधिकारी, पोलीस कर्मचारी, शिपाई, व्हिडिओ ग्राफर व सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश राहील. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना भारतरत्न सर विश्वेसरैया हॉल, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ५, तिसरा मजला अर्सेनल प्लॉट, हॉटेल सागर प्लाझा समोर, कॅम्प, पुणे येथील सभागृहात १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणात निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा भोसले तसेच पोस्टल बॅलेटचे समन्वय अधिकारी पी.के. कांबळे मार्गदर्शन करणार आहेत.