पुणे – कोथरूड विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारसंघात ४८ टक्के मतदान झाले. शेवटच्या तासात काही मतदान केंद्रावर गर्दी झाल्यामुळे सहानंतरही अर्धा ते पाऊण तास मतदान प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे कोथरूड मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास एकूण ५२.१८ टक्के मतदान झाले.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. २०१९ मध्ये मतदारसंघात ४८.२० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा सकाळपासून मतदारांची गर्दी पाहता मतदानाचा टक्का वाढणार की कमी होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. लोकसभेला ज्याप्रमाणे सकाळच्या टप्यात मतदार बाहेर पडल्याचे चित्र मतदान केंद्रावरील गर्दीने दिसून आले, तसेच विधानसभेच्या निवडणुकीत कोथरूडमध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदारसंख्या तुलनेने कमी होती.
काही मोजक्याच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती. त्यामुळे ४५ टक्क्यांच्या पुढे तरी मतदान होईल का, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, टप्याटप्याने मतदान वाढले आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ४८ टक्यांपर्यंत पोहचला. तर सायंकाळी सहापर्यंत एकूण ५२.१८ टक्के मतदान झाले.
यावेळी नवमतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मतदान करून बाहेर आल्यावर सेल्फी आणि मतदान फ्रेमसमोर फोटो काढण्याची लगबग सुरू होती. केंद्रावर वृद्ध व्यक्तींसाठी व्हीलचेअर असल्यामुळे नागरिकांनी गैरसोय टळली. मात्र, काही मतदानकेंद्रावर रस्ते बंद केल्यामुळे नागरिकांना चालत जावे लागत होते.
वेळ आणि मतदान
सकाळी नऊ वाजेपर्यंत : ६.५० टक्के
सकाळी ११ वाजेपर्यंत : १६.०५ टक्के
दुपारी एक वाजेपर्यंत : २७.६० टक्के
दुपारी तीन वाजेपर्यंत : ३७.८० टक्के
सायंकाळी पाच वाजेपर्यंत : ४७.४२ टक्के
सायंकाळी सहा वाजेपर्यंत : ५२.१८ टक्के
मतदानासाठी परदेशातून पुण्यात
आपले मतदान वाया जावू नये यासाठी नोकरी, शिक्षणानिमित्त परराज्यासह परदेशात गेलेले जागृत मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुण्यात येतात. आज कोथरूड मतदारसंघातील डहाणुक काॅलनीतील रहिवाशी सौरभ अथणीकर हे दुबईहून पुण्यात मतदानासाठी आले आणि मतदानाच हक्क बजावला. तसेच अमेरिका, दुबई, सौदी, लंडन, जर्मनी यासह अन्य देशातून आलेल्यांची संख्या अधिक दिसली.
सर्वांसाठी सुविधा…
मतदारसंघात बहुतांश केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर सुविधांसह कर्मचारी नेमणूक केली होती. तर मतदानासाठी लहान मुलांना घेऊन आलेल्या मुलांसाठी खेळघर तर महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आला होता. त्यामुळे महिलांचा त्याला फायदा झाला. तसेच चौकांमध्ये तरूण मुलांकडून मतदानाचा हक्क बजावा, असे पोस्टर हातात घेऊन जनजागृती केली जात होती.