दिवाळी फराळ कार्यक्रमात उमेदवार मतदारांच्या भेटीला
पुणे – “मिनी इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सर्व जातीधर्माचे लोक एकत्र राहतात. या मतदारसंघात सर्वांमध्ये असलेली एकात्मता हे या मतदारसंघाचे वैशिष्ट्य आहे. २०१४ पासून या मतदारसंघाने भाजपला ताकद दिली असून, यंदाही मतदार भाजपलाच साथ देतील असा विश्वास महायुतीचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केला.
दिवाळी निमित्ताने विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था संघटनाच्या वतीने दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील समस्त लष्कर आघाडी यांच्या तर्फे “दिवाळी फराळ’ कार्यक्रमाच्या निमित्ताने कांबळे यांनी नागरिकांशी संवाद साधत दिवाळी साजरी केली.
या कार्यक्रमास प्रशांत यादव, संतोष भगत, विनय काटकर, विवेक बेलमपील्ली आदि प्रमुख मान्यवर तसेच पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्तेदेखील सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाला उपस्थित राहून दिवाळी फराळ सोबतच अनौपचारिक गप्पांच्या साथीने सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. समस्त लष्कर आघाडीच्या कार्यक्रमासह इतर कार्यक्रमांनाही कांबळे यांनी हजेरी लावत मतदारांशी संवाद साधला.