पुणे – लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून मतदारांना छायाचित्र मतदार ओळखपत्राचे (फोटो व्होटर स्लीप) वाटप करण्यात येत आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे मतदारांना घरी जाऊन व्होटर स्लीप देत आहेत. पुणे व बारामती लोकसभा निवडणुकीसाठी दि.23 एप्रिल रोजी मतदान होणार असून पुणे व बारामती मतदारसंघातील 41 लाख 87 हजार मतदारांना फोटो व्होटर स्लीप मिळणार आहे. या स्लीपवर, बीएलओ यांचे नाव आणि मोबाइल नंबर, मतदान केंद्राचा पत्ता, मॅप, मतदार यादीतील अनुक्रमांक आदींची माहिती बरोबरच सूचनाही दिल्या आहेत.
मतदानाची प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, बोगस मतदानाला आळा बसावा, या हेतूने प्रत्येक मतदाराला फोटो व्होटर स्लीप देण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले आहे. यापूर्वी उमेदवारच मतदारांना स्लीप देत होते. तसेच मतदान कक्षात जाताना त्या स्लीपवर असलेले उमेदवाराचे नाव व निवडणूक चिन्ह असल्याने त्यावर बंदी आहे. ही बाब विचारात घेऊन निवडणूक आयोगाने मतदारांना फोटो व्होटर स्लीप देण्याचा उपक्रम मागील लोकसभा निवडणुकीपासून हाती घेतला आहे. विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी यांनी फोटो व्होटर स्लीपची छपाई केली असून मतदान केंद्र निहाय त्याचे गठ्ठे तयार केले आहेत. याचे वितरण बीएलओ यांना करण्यात आले आहे. बीएलओ घरी जाऊन फोटो व्होटर स्लीपचे वाटप करत आहेत.
व्होटर स्लीपवर ही असणार माहिती
* मतदाराचे छायाचित्र
* मतदार यादीतील अनुक्रमांक
* मतदान केंद्राचा पत्ता
* मतदान केंद्रावर जाण्यासाठीचा मॅप
* मतदानाची वेळ
व्होटर स्लीपवर या आहेत सूचना
* महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग
* मतदानाच्या शेवटीवेळी रांगेत असलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्याची अनुमती
* विशिष्ट उमेदवाराला मत देण्याकरिता पैसे किंवा इतर कोणतीही स्वीकृती देणे किंवा स्वीकारणे ही कायद्यांतर्गत भ्रष्ट आचरण आहे