पुणे – या वेळच्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेत जिल्हा प्रशासनाकडून छायाचित्र मतदार ओळखपत्राचे (फोटो वोटर स्लिप ) वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांत मिळून एकूण 88 लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. तर जिल्ह्यात सुमारे 8 हजार 500 इतके मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) असून हे अधिकारी मतदारांना घरी जाऊन वोटर स्लिप देणार आहेत.
मतदानाची प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, बोगस मतदानाला आळा बसावा, या हेतूने प्रत्येक मतदाराला फोटो वोटर स्लिप देण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले आहे. यापूर्वी उमेदवारच मतदारांना स्लिप देत होते. तसेच मतदान कक्षात जाताना त्या स्लिपवर असलेले उमेदवाराचे नाव व निवडणूक चिन्ह असल्याने त्यावर बंदी आहे. ही बाब विचारात घेऊन निवडणूक आयोगाने मतदारांना फोटो वोटर स्लिप देण्याचा उपक्रम लोकसभा निवडणुकीपासून हाती घेतला आहे.
वोटर स्लिपवर असणारी माहिती
मतदाराचे छायाचित्र, मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता, मतदान केंद्रावर जाण्यासाठीचा नकाशा, मतदानाची वेळ
वोटर स्लिपवरील सूचना
महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग, वेळ संपल्यावर रांगेत असलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्याची परवानगी, विशिष्ट उमेदवाराला मत देण्याकरिता पैसे किंवा इतर कोणतीही स्वीकृती देणे किंवा स्वीकारणे ही कायद्यांतर्गत भ्रष्ट आचरण आहे.