पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत शाळेतील ११०० हून अधिक पालकांनी शाळेत उपस्थित राहून मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.मुख्याध्यापिका कल्पना वाघ व शिक्षिका प्रिया इंदुलकर यांनी पालकांशी संवाद साधला.
तसेच शाळेच्या परिसरात विद्यार्थी व पालकांनी मानवी साखळी करून परिसरातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून आपले कर्तव्य पूर्ण करण्याविषयी जागृती केली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या मार्फत पालकांकडून मतदान करण्याबाबतचे संकल्प पत्र लिहून घेण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांची शाळेच्या परिसरात घोष फलकांसह मतदान जागृती प्रभात फेरी काढण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदान जागृती संदर्भात घोषवाक्यांचे लेखन केले. शाळेच्या माध्यमातून पालकांचे मतदान जागृती विषयी प्रबोधन व्हावे म्हणून पालकांसाठी निबंध लेखन व चित्रकला उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी शाळेतून आपल्या आई- वडिलांना पत्र लिहून मतदान जागृती केली. शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग व मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक तनुजा तिकोने, धनंजय तळपे , योगिता भावकर, पुष्पा देशमाने, तसेच समग्र शिक्षा अभियान विभागाच्या शिक्षकांनी या अभियानातील उपक्रमांचे नियोजन केले होते.