पुणे – वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत स्विप कमिटी यांच्या माध्यमातून शिवराज माध्यमिक विद्यालय चंदन नगर- वडगाव शेरी या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांची परिसरातून प्रभात फेरी व सायकल रॅली काढून मतदार जागृती करण्यात आली .
स्विप कमिटीचे सहाय्यक नोडल अधिकारी संतोष जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मतदानाची संविधानात्मक अधिकार आणि जबाबदारी यासंबंधी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी पालकांना शंभर टक्के मतदान करण्यासंबंधी आवाहन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या पालकांना व परिसरातील मतदारांना शंभर टक्के मतदान करण्यास सांगावे अशा सूचना संतोष जाधव यांनी दिल्या.
व्होटर हेल्पलाईन या संबंधी विद्यार्थ्यांना माहितीही देण्यात आली. सहाय्यक नोडल अधिकारी सचिन खांदवे यांनी छोटे जवान क्या करेंगे, सभी बडोंको मतदान का आवाहन करेंगे अशी घोषणा देऊन मतदान करण्यासंबंधी शपथ दिली.
सहाय्यक नोडल अधिकारी रमेश सोनवणे, सतिश धडस यांनी सायकल रॅलीस मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात मतदान जागृती साठी निबंध लेखन केले व रांगोळी काढली. या कार्यक्रमात साधारण नऊशे विद्यार्थी सहभागी होते. शाळेचे मुख्याध्यापक वंदना पठारे व पी. एस. कवठाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षक बीएलवो यांनी मतदान जागृती संबंधी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.