पुणे – निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मागील महिनाभर महापालिकेकडून शहरात मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेच्या किती कर्मचाऱ्यांनी मतदान केले याचीच माहिती पालिकेकडे नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
विशेष म्हणजे, महापालिका कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे या उद्देशाने महापालिका आयुक्तांनी अत्यावश्यक सेवा वगळता तर सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना २० नोव्हेंबर २०२४ला मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी पुणे महापालिकेची सर्व कार्यालयांना (अत्यावश्यक सेवा वगळून) सुट्टी जाहीर केली होती. तसेच, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सदर दिवशी दोन तासाची सवलत देण्यात आली होती.
या शिवाय, सर्व खातेप्रमुख यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी मतदान केल्याबाबत खातरजमा करून त्याबाबतचा अहवाल कामगार कल्याण विभागास सादर करण्याचे आदेशही दिले होते. मात्र, महापालिकेच्या ३० ते ३५ विभागातील केवळ एकाच विभागाने कर्मचाऱ्यांनी मतदान केल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे, एका बाजूला शहरभर महापालिका जनजागृती करीत असताना दुसरीकडे मात्र आपल्याच कर्मचाऱ्यांनी मतदान केले की नाही याचीच माहिती पालिकेकडे नसल्याची समोर आले आहे.
निवडणूक कर्मचारीही वंचित…
महापालिका सामान्य प्रशासन विभाग आणि निवडणूक विभागातील समन्वयांच्या अभावी निवडणूक कामासाठी नेमण्यात आलेल्या अनेक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही आपला मतदानाचा हक्का बजावता आलेला नसल्याचे समोर आले आहे. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपले नेमके किती कर्मचारी या कामासाठी गेले आहेत. त्यांची नावे काय याची कोणतीही माहिती पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे नव्हती. त्यामुळे, अनेक कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानासाठीचे बॅलेट पेपरच मिळाले नसल्याने ते सुद्धा मतदानापासून वंचित राहिले आहेत.
“मतदानाच्या दिवशी महापालिकेस सुट्टी देण्यात आली होती. तसेच, सर्व विभाग प्रमुखांना मतदान केलेल्या कर्मचाऱ्यांचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, आमच्याकडे एकाच विभागाचा अहवाल आलेला आहे.” – नितीन केंजळे, कामगार कल्याण अधिकारी.