PUNE : ट्रकचालकाच्या निष्काळजीपणाचा बळी; ट्रकमधील सळई घुसून दुचाकीस्वार ठार

शहरात तीन अपघातात तीघे ठार

पुणे – शहरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. लोणीकंद परिसरात एका ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे सळई पोटात घुसून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

सागर शंकर वाघमारे (20 , रा. खुळेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीसांनी रमेश नंदकुमार साठे (24 ) याला अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक रमेश हा भरधाव ट्रक घेऊन अहमदनगरकडून पुण्याकडे येत होता. तर, पाठिमागून दुचाकीस्वार सागर हा येत होता. यावेळी महालक्ष्मी स्टीलच्या दुकानासमोर आल्यानंतर रमेश याच्या ट्रकने अचानक वळन घेतले. यावेळी पाठिमागून आलेल्या सागरच्या पोटात ट्रकमधील सळई घुसली. यात तो खाली कोसळून गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

तर, सिंहगड रोड परिसरात टेम्पोच्या धडकेत कोमल भारत अडागळे (33 , रा. पर्वती) यांचा मृत्यू झाला आहे. तर, त्यांचे पती भारत अडागळे (38 ) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारत हे त्यांच्या दुचाकीवरून पत्नीला घेऊन घरी जात होते. ते वेताळबुवा चौकाकडून भूमकर चौकाकडे जात असताना भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यावेळी पाठिमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी खाली पडून गंभीर जखमी झाल्या. यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो चालक तेथून पसार झाला. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

तसेच, लोणीकंद परिसरात कारच्या धडकेत एका 32 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कार चालक कान्हु तुकाराम कर्डीले (53 , रा. वडगाव शेरी) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार दिपक महाले यांनी सरकारतर्फे लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुरूवारी रात्री वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.