Pune Fire News : रायगड तालुक्यातील धानेप येथील धनगरवस्तीवर भीषण आगीचे संकट कोसळले असून, चार सख्ख्या भावांची घरे डोळ्यादेखत जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र चारही कुटुंबांचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. (Pune Fire News) मिळालेल्या माहितीनुसार, तोरणा खोऱ्यातील धानेप येथील धनगरवस्तीमध्ये लागलेल्या आगीत विठ्ठल महादू डोईफोडे, शिवाजी महादू डोईफोडे, सुरेश महादू डोईफोडे आणि लक्ष्मण महादू डोईफोडे या चार भावांची घरे जळून भस्मसात झाली. (Pune Fire News) प्राथमिक माहितीनुसार, घरातील वीज मीटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच घरात मोठ्या प्रमाणात जनावरांचा चारा साठवलेला असल्याने आगीने झपाट्याने विक्राळ रूप धारण केले. (Pune Fire News) घटनेच्या वेळी विठ्ठल डोईफोडे यांची आई घरातच होती. आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी बाहेर धाव घेतली. मात्र त्या वेळी आजूबाजूला कोणी नसल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. या आगीत दागिने, रोख रक्कम, अन्नधान्य, कपडे आणि इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे चारही कुटुंबांचे संसार अक्षरशः उघड्यावर आले आहेत. (Pune Fire News) घटनेची माहिती मिळताच तलाठी आत्माराम हापसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. स्थानिक नागरिकांनी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली असून, या जळीतग्रस्त कुटुंबांना लवकरात लवकर आर्थिक सहाय्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आग नेमकी शॉर्टसर्किटमुळे लागली की डोंगरावरील वनव्यामुळे वाऱ्याच्या झोताने ती वस्तीजवळ पोहोचली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. (Pune Fire News)