पुणे – शहरासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोर धरू लागला आहे. प्रचारासह नेत्यांच्या सभा, रॅलीला वाहनांची संख्या अधिक वाढत आहे. त्यामध्ये ओपन जिप्सी, ओपन ट्रक, सनरूफ आणि एलईडी व्हॅन असलेल्या वाहनांची मागणी अधिक आहे.
निवडणूक आयोगाकडून तयार केलेल्या एक खिडकीमध्ये पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून निवडणुकीसाठी आतापर्यंत ४४४ वाहनांची परवानगी घेण्यात आली असल्याची माहिती आरटीओ प्रशासनाकडून देण्यात आली.
निवडणूक प्रचारामध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांना प्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी घेणे गरजेचे असते. परवानगी मिळाल्यानंतरच निवडणूक प्रचारासाठी वाहनांचा वापर करता येतो. यामध्ये परमिट नसलेल्या वाहनांचा वापर करता येत नाही.
तसेच, वाहनात स्वतंत्र लाउड स्पीकर बसवणे किंवा त्यामध्ये बदल करायचा असेल तरी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. संबंधित वाहनाच्या परमिट कार्डची मूळ प्रत वाहनाच्या पुढच्या स्क्रीनला चिकटवणे गरजेचे आहे. तसेच, ते वाहन कोणत्या उमेदवाराकरिता वापरले जात आहे याचा उल्लेख स्पष्टपणे करणे अनिवार्य आहे.
बारामती व हडपसरमधून सर्वाधिक…
पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात वाहन परवान्यासाठी ४९४ अर्ज आले होते. त्यापैकी ४४४ वाहनांना परवाने देण्यात आले. तर १५ वाहनांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. पुणे जिल्ह्यात बारामती ६४ आणि हडपसरमध्ये ६३ वाहनांना सर्वाधिक परवाने घेण्यात आले आहेत. वडगावशेरी आणि मावळमध्ये सर्वात कमी अर्ज आले आहेत. चिंचवड, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव या ठिकाणी वाहनांसाठी परवाना घेण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक प्रचारासाठी सायकल पासून फ्लोट ट्रकपर्यंत वाहनांचा वापर होतो. एकूण वाहन परवान्यामध्ये २६२ वाहनांना स्पीकरसह परवाना देण्यात आला आहे. तर, एलईडी असलेल्या १७ वाहनांनी परवानगी घेतली आहे. त्यामध्ये आंबेगाव व पुरंदर मतदार संघाचा समावेश आहे.
पण, दुसरीकडे प्रचार साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवाना घेतला नसल्याचे दिसून आले. काही मतदारसंघात निवडणूक साहित्याची वाहतूक करण्यासाठी अर्ज आले होते. मात्र, कागदपत्राची पूर्तता नसल्यामुळे ते नामंजुर करण्यात आले आहेत.