अल्पउत्पन्नधारक 5 लाख जणांना लसीकरणाचे उद्दिष्ट
पुणे – पुणे वैद्यकीय सेवा आणि संशोधन प्रतिष्ठान संचलित बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि “पीपीसीआर’च्या वतीने पश्चिम महाराष्ट्र प्रांतात अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी “वज्रनिर्धार’ हे मोफत लसीकरण महाअभियान राबवण्यात येत आहे.
या अंतर्गत आतापर्यंत 1 लाख 32 हजार 295 हून अधिक नागरिकांना मोफत लस दिली असून, येत्या काळात 5 लाख मोफत लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात पुणे महानगरातील 75 हून अधिक संस्था, संघटना, मंडळे आणि धार्मिक ट्रस्टचा सहभाग असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी दिली. यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. बहार कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव उपस्थित होते.
अशी राबवली जाते प्रक्रिया
सेवा वस्तींमध्ये राहणाऱ्या कुटुंब आणि त्यातील लसीकरणासाठी पात्र नागरिकांशी महाअभियानातील संस्था, संघटना, मंडळे आणि ट्रस्ट संघ स्वयंसेवकांच्या मदतीने संपर्क करत असून, लसीकरण न झालेल्या लसीकरण केंद्र, वेळ, तारीख आदी तपशील असणारे कुपन दिले जाते.
संबंधित नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय आवश्यक कागदपत्रांसह केंद्रावर येऊन लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करत आहे. पुणे महानगरात आतापर्यंत 85 हजार 266 पात्र नागरिकांचे लसीकरण अभियानांतर्गत झाले आहे. आवश्यक ठिकाणी फिरत्या लसीकरण केंद्राचीदेखील सोय उपलब्ध करुन दिल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.