पुणे – महायुतीचे सरकार महिला, शेतकरी, विद्यार्थी व विविध सामाजिक घटकांना विचारात घेऊन विकासाची प्रचंड कामे करीत आहे. त्यामुळे प्रचाराचा मुद्दा नसल्याने महायुतीत फूट तसेच कार्यकर्त्यांमध्ये फूट पडल्याच्या अफवा पसरविल्या जात असून कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा विजय निश्चित असल्याची खात्री बाळगावी, असे आवाहन माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केले. टिंगरेनगर येथील महायुतीच्या महाबैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मुळीक म्हणाले की, महायुती भक्कम आहे. सर्वजण एकदिलाने काम करीत आहेत. सुनील टिंगरे हे महायुतीचे म्हणजेच आपल्या सर्वांचे उमेदवार आहेत, हे मतदारांना समजावून सांगण्याचे आवाहनही मुळीक यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
तर महायुतीतील सर्व घटक पक्षांनी मित्रपक्षांचा एकदिलाने प्रचार करायचा आहे. मोदींच्या सभेनंतर महायुतीसाठी वातावरण अधिकच अनुकूल होणार आहे, असा दावा भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी यावेळी केला.
दरम्यान, या मेळाव्यापूर्वी वडगावशेरी भागातील सुनीता नगर, साईनगरी, गणेशनगर भागात प्रचार करण्यात आला. या वेळी महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, नारायण गलांडे, संदीप जऱ्हाड, ज्ञानेश्वर शिंदे, उषा कळमकर, महेश गलांडे, विशाल साळी, आशा जगताप, मनोज पाचपुते, महेश गलांडे, ज्योती जावळकर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सिनेअभिनेते भाऊ कदम हे सुनील टिंगरे यांच्या पदयात्रेत सहभागी झाले होते. कदम यांच्या उपस्थितीमुळे टिंगरेंच्या पदयात्रेची चांगलीच हवा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी कदम यांनी मतदारांना टिंगरे यांना मतदान करण्याचे आवाहन केले.