पुणे -लसीसाठी स्लॉट बुकिंगचा गोंधळ दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देणार असल्याचे रात्री उशिरा जाहीर केल्याने अनेकांची निराशा झाली.
महापालिकेने जवळपास 70 केंद्र लसीकरणासाठी सुरू केली. मात्र, रात्री उशिरा याची यादी जाहीर केली. लसींचा तुटवडा असल्याचे वारंवार राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींकडून येत असल्याने अनेक जणांनी लसींचा स्लॉट नोंदणी करण्यासाठी दिवस घालवत आहेत. त्यासाठी महापालिकेने वेळ ठरवून दिली; परंतु यावेळी नोंदणी करण्यासाठी उघडल्यानंतर पाच ते सहा सेकंदांत सगळ्या केंद्रांवरील बुकिंग झाल्याने गडबड झाली. 70 टक्के कोटा दुसरी लस घेणाऱ्यांना आणि 30 टक्के कोटा हा 18 ते 44 वयोगटासाठी असल्याने “हाजीर तो वजीर’ याप्रमाणे बुकिंगची स्थिती झाली होती.
एकदा लस जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी पुढे कोणाला किती द्यायची हा निर्णय त्यांचा असतो, तो राज्याचा नसतो. याशिवाय त्याचे वितरण कसे करायचे आणि किती लसी द्यायच्या याचे नियोजनही स्थानिक प्रशासनाने करायचे आहे. लाभार्थ्यांची नोंद मात्र त्यांनी कोविनवर करणे बंधनकारक आहे.
– डॉ. दिलीप पाटील, राज्याच्या लसीकरणाचे प्रमुख आणि आरोग्य सहसंचालक, महाराष्ट्र राज्य
संध्याकाळी आठ वाजता ऑनलाइन नोंदणी होऊ शकणार आहे. त्यामध्ये वेगाने नोंदणी होते. मात्र, त्यामध्ये प्रशासनाचा काही रोल नाही. ठरवून दिलेला कोटा पूर्ण झाल्यानंतर बुकिंग होऊ शकणार नाही. तसेच परस्पर कोणीही कोणाचे नाव टाकू शकत नाही.
– डॉ. वैशाली जाधव, लसीकरण विभागप्रमुख,
पुणे महापालिका