पुणे – शेतकरी निवासचा ‘कंत्राटी’ कामगारांकडून वापर

पुणे – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात ठेकेदाराचे कामगार भर उन्हाळ्यात शेतकरी निवासमध्ये पंख्याची हवा घेत आहेत. तर, दुसरीकडे गावाकडून शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याला मात्र उघड्यावर झोपावे लागत आहे. बाजार समितीने दोन दिवसांपूर्वी शेतकरी निवास रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याचा शेतकऱ्यांएवजी कामगार फायदा घेत आहेत. त्यामुळे कंत्राटदारांसाठी पायघड्या घालणारे बाजार समिती प्रशासनाचे डोळे आता तरी उघडणार का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

बाजार समित्यांमध्ये शेतकरी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येत असतो. रात्रीच्या वेळेला शेतकऱ्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी बाजार समित्यांमध्ये शेतकरी निवास उभारण्यात आले आहेत. त्याचा वापर फक्त शेतकऱ्यांसाठी केला जावा हाच त्यामागील उद्देश आहे. बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दारासह इतर विभागांच्या प्रवेशव्दारावर शेतमालाची आवक-जावक नोंदणीच्या कामाचा ठेका स्टर्लिंग नावाच्या कंपनीला दिला आहे. कोणत्याही कामाची निविदा देताना त्या कामासह ठेकेदाराकडून ठेवलेल्या कामगारांची जबाबदारी ही संबंधित ठेकेदाराची असते. मात्र, ठेकेदाराच्या कामगारांसाठी बाजार समितीने दारे खुली केली आहेत. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार का हे पाहणे जरूरीचे ठरणार आहे.

कंत्राटदाराच्या कामगारांना रूम दिल्याबाबत शेतकरी निवासमधील कर्मचाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, साहेब लोकांनी त्यांना परवानगी दिली असून याबाबत अधिक माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.