Pune| सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता भोवली; रस्त्यावर थुंकणे, लघुशंका करणाऱ्यांवर कारवाईला वेग

पुणे – रस्त्यावर जागा मिळेल तिथे थुंकणे आणि लघुशंका करणाऱ्यांंसह, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई तीव्र करण्यात आली आहे. अशा प्रकारे अस्वच्छता करणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर महापालिकेकडून नोव्हेंबरमध्ये १९ लाख ७३ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या सुमारे २ हजार ३२४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल १२ लाख ७९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच कचरा जाळणाऱ्या ५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे २५ हजारांचा दंडही वसूल करण्यात आलेला आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार दि. १ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत रस्त्यावर थुंकणाऱ्या ४७ जणांवर महापालिकेच्या गस्तीपथकांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे ४७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर स्वच्छतागृहाचा वापर न करता रस्त्याकडेला लघुशंका करणाऱ्या तब्बल ७३६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ लाख ४७ हजार २०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रस्त्यांवर पाळीव प्राण्यांनी घाण केल्याचे आढळल्याने दोन जणांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.
या कारवाईत सर्वाधिक २ हजार ३२४ जणांवर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यात रस्त्यावर कचरा टाकणे, वर्गीकरण न करता कचरा देणे अशा कारवायांचा समावेश आहे. या बेशिस्त नागरिकांकडून सुमारे १२ लाख ७९ हजार २७४ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, शहरातील स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या मात्र, हे काम करताना गणवेश परिधान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली असून अशा १९ कर्मचाऱ्यांकडून २४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
असा वसूल केला दंड
रस्त्यावर थुंकणे – ४७ हजार रु.
रस्त्याकडेला लघुशंका करणे – १ लाख ४७ हजार २०० रु.
कचरा जाळणे – २५ हजार रु.
कचरा वर्गीकरण न करणे – ६८ हजार रु.
कचरा स्वच्छ संस्थेला न देणे – ३८०० रु.
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता – १२ लाख ७९ हजार रु.
बल्क वेस्ट जनरेटर – ३५ हजार रु.
बांधकाम राडारोडा- ९४ हजार रु.
बंदी असलेले प्लॅस्टिक वापरणे – २ लाख ५० हजार रु.





