कोंढवा – हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार साईनाथ संभाजी बाबर यांच्या प्रचारार्थ संपूर्ण मतदारसंघात काढलेल्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जोरदार शक्ती प्रदर्शन करीत साईनाथ बाबर यांनी प्रचाराची सांगता केली. सांगता रॅलीला हजारो युवकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता साईनाथ बाबर यांचा विजय अटळ असल्याची चर्चा आहे.
साईनाथ बाबर म्हणाले की, हडपसर मतदार संघातील हजारो नागरिकांनी उस्फूर्तपणे या रॅलीत सहभागी होत विजय हा सत्याचाच असतो, जनता पाठीशी यावेळी ठामपणे उभे राहिली असल्याचे दाखवून दिले. हडपसर मतदार संघाचा रखडलेले विकास करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. बुधवारी (दि.20) रेल्वे इंजिन चिन्ह समोरील बटन दाबून हडपसरच्या नवनिर्माणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन साईनाथ बाबर यांनी यावेळी केले.
कात्रज येथील तलावातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून साईनाथ बाबर यांच्या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीला सर्वधर्मीय नागरिक, विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खरी ताकद या रॅलीतून दिसून आली. घोषणाबाजी, झेंडे व पताक्यांमुळे परिसर मनसेमय झाला होता.
कात्रज- सुखसागर नगर, टिळेकर नगर, कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द, एनआयबीएम, कृष्णा नगर, मंमदवाडी, सातव नगर, सय्यद नगर, काळेपडळ, ससाणे नगर, हडपसर गावठाण, गाडीतळ, सातववाडी, गोंधळ नगर, महादेव नगर, मांजरी, केशवनगर, मुंढवा, साडे सतरा नळी, घोरपडी, भीमनगर, मगरपट्टा, रामटेकडी, वैदुवाडी, आदी परिसरातून रॅली निघाली.
हडपसरमध्ये लोकशाही व सर्वांगीण विकास साधायचा असेल तर माणुसकी जपणाऱ्या व जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणाऱ्या साईनाथ बाबर यांना यावेळी जनता निवडून देईल. ही निवडणूक विकास पर्व सुरू करून हडपसरचे नवनिर्माण करण्याची आलेली एक संधी आहे त्यामुळे हडपसरमधील सर्व मतदार बंधू-भगिनी मनसेला विजयी करावे, असे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.