बिबवेवाडी(प्रतिनिधी) – प्रभाग क्रमांक 28 मधील महानगरपालिकेच्या वैरागे उद्यानमध्ये ईलु-ईलु सिनेमाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले. स्थानिक भाजप नगरसेविका यांच्या मुलाच्या हस्ते सदरबाबत कोणतीही परवानगी न घेतलेल्या चित्रीकरणाचा श्री गणेशा करण्यात आला. ‘प्रसन्न’ वातावरणात झालेल्या उद्घाटन सोहळ्यास राजकीय वरदहस्त कोणत्या हेतूने होता असा प्रश्न उपस्थित होत आहे.
“वैरागे उद्यान मध्ये सिनेमाचे चित्रीकरण सुरू होते. सुरक्षा रक्षकाचे नातेवाईक मयत झाल्याने नेहमीचा सुरक्षा रक्षक तेथे उपस्थित नव्हता. वरिष्ठांशी चर्चा करून पुढील कारवाई करण्यात येईल.
– राजेश भुजबळ (हॉर्टीकल्चर मिस्त्री, वृक्ष प्राधिकरण विभाग)
सदर महानगरपालिकेच्या उद्यानात चित्रीकरणासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. सदरबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उद्यान विभागाच्या मुख्य अधिकारी यांनी दिली.
“महानगरपालिकेच्या उद्यानात सिनेमा चित्रीकरणाची अशी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. संबधित चित्रीकरण तातडीने थांबवून पुढील कारवाई करण्यात येईल.
– अशोक घोरपडे (मुख्य अधिकारी उद्यान विभाग, पुणे महानगरपालिका)
महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये परवानगी न घेता अश्या पध्द्तीने चित्रिकरणसाठी प्रवेश मिळतो कसा? महानगरपालिकेची उद्याने नक्की कोणाच्या मालकीची व कोणाच्या ताब्यात असतात हीच चर्चा प्रभागात सुरू आहे.