महापालिका आयुक्तांची परवानगी : आजपासूनच अंमलबजावणी
सकाळी 9 ते सायं. 7 पर्यंत व्यवसाय
पुणे – शहरातील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने आता संपूर्ण आठवडाभर सुरू राहणार आहेत. मुंबईच्या धर्तीवर पुणे महापालिकेनेही दुकानांसाठीची पी-1,पी-2 नियमावली अखेर रद्द केली आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांबाहेरील अत्यावश्यक तसेच बिगर अत्यावश्यक दुकाने बुधवारपासून पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. मात्र, दुकानांसाठीची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळ कायम ठेवण्यात आली आहे.
शहरात अनलॉक शिथिल करताना महापालिकेने 3 जूनच्या आदेशात पी-1, पी-2 प्रमाणे दुकाने उघडण्यास मुभा दिली होती. त्यानंतर व्यापारी संघटनांनी या निर्णयास विरोध केला होता. तसेच हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राज्य शासनाकडेही करण्यात आली होती. या निर्णयामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या व्यावसायिकांना आठवड्यातून केवळ तीन ते चार दिवसच दुकाने उघडता येत होती. त्यातच सलग लॉकडाऊनमुळे व्यावसायिक तसेच व्यापाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता.
त्यामुळे अनलॉक-3 सुरू होताना, पी-1,पी-2 नियम रद्द करावा तसेच सरसकट दुकाने उघडण्यास मुभा द्यावी यासाठी व्यापारी संघटनांनी मागणी केली होती. मात्र, सुरुवातीला त्यास नकार देण्यात आला. त्यानंतर मात्र आता निवासी सुविधा असलेले हॉटेल्स आणि लॉजसह खासगी वाहतुकीस मुभा देताना पी-1, पी-2 चे बंधनही मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व दुकाने आठवडाभर सुरू राहणार आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रांत फक्त अत्यावश्यक सेवाच
प्रतिबंधित क्षेत्रासाठी दुकाने सुरू ठेवण्याचा नियम लागू राहणार नाही, असे महापालिका आयुक्तांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांत सध्या केवळ अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू आहेत. तसेच प्रतिबंधित क्षेत्रांसाठी सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 6 या वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्या ठिकाणी ही सवलत राहणार नसल्याचे आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.