पुणे विद्यापीठाचा “महासंकल्प’; 20 हजार विद्यार्थ्यांना कडुनिंब रोपांचे वाटप

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज उद्‌घाटन 

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी या महासंकल्प अभियानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी सकाळी 11 वा. होणार आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करण्यासाठी 20 हजार विद्यार्थ्यांना कडुनिंबाच्या रोपांचे वाटपही करण्यात येणार आहे.
पंढरपूरकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालख्यांच्या वारी मार्गावर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांमार्फत अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानात वारीमार्गावरील स्वच्छता,

50 लाख पानाच्या पत्रावळ्याचे वाटप, 700 टन ओला कचरा व निर्माल्य संकलन, 350 टन सेंद्रीय खतनिर्मिती, 35 लाख लिटर पाण्याची बचत, 1 लाख वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी व सेवासुश्रुषा, 1 लाख चष्म्यांचे वाटप, पथनाट्याद्वारे 2 लाख वारकरी व गावकऱ्यांचे प्रबोधन, कडुनिंबाच्या 20 हजार रोपांची वारीवार्गावर लागवड करून संगोपन करण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे.

महासंकल्प अभियानात 20 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या अभियानासाठी विद्यापीठाच्या आवारातील मुख्य क्रीडांगणावर मोठा समारंभ होणार आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करण्यासाठी कडुनिंब रोपांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. सकाळी 7.30 ते 10.30 वा.पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यात प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक कडुनिंबाचे रोप देण्यात येणार आहे. याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.

ड्रोनद्वारे छायाचित्र घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री विद्यार्थ्यांना अभियानाची शपथही देणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.प्रभाकर देसाई यांनी दिली आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहवे लागणार
महासंकल्प अभियानांच्या उद्‌घाटन समारंभासाठी आज (रविवार) सुट्टीच्या दिवशी विद्यापीठ कार्यालये सकाळी 8 ते सांयकाळी 4 या वेळेत सुरु राहणार आहेत. त्यामुळे सर्वांनी कार्यालयात उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. या दिवसाची पर्यायी सुट्टी येत्या 13 सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे, अशा आशयाचे परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी जारी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.