परीक्षेत विचारला प्रश्न : तातडीने खुलासा सादर
पुणे – अंतिम वर्षाच्या परीक्षेत “जिदाही दहशतवाद’ या शब्दावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अडचणीत आले आहे. परीक्षेत “जिहादी दहशतवादाचे मुख्य कारण कोणते? असा प्रश्न विचारण्यात आल्याने त्यावर विद्यापीठावर टीकेची झोड उठली. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तातडीने खुलासा केला आणि दिलगिरी व्यक्त करीत सारवासारव केली.
विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होत आहे. यात तांत्रिक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले आहे. विद्यापीठ परीक्षेचा हा गोंधळ समोर आल्यानंतर त्यात सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून परीक्षा सुरळीत सुरू आहे. पण, प्रश्नांची व पर्यायांची तज्ज्ञ समितीकडून व्यवस्थित छाननी न झाल्याने अनेक समस्या अद्यापही येत आहेत.
त्यातच मंगळवारी समोर आलेल्या एका प्रकारामुळे विद्यापीठ अडचणीत आल्याचे दिसून आले.
पुणे विद्यापीठातर्फे “डिफेन्स बजेटिंग’ या विषयाची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये “जिहादी दहशतवादाचे मुख्य कारण कोणते?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात “धार्मिक’, “क्रांतिकारी’, “राजकीय’ आणि “राज्य पुरस्कृत’ असे चार पर्याय देण्यात आले होते.
मात्र, त्यानंतर हा प्रश्न सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठावर टीका होऊ लागली. यामुळे विद्यापीठाने याबाबत तातडीने खुलासा केला आहे. “विद्यापीठ 3 हजार 300 विषयांची परीक्षा घेत आहे, पण एका विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अनावधानाने चुकीच्या शब्दाचा उल्लेख झाला आहे. त्याबाबत विद्यापीठ प्रशासनातर्फे दिलगिरी व्यक्त केली आहे. संबंधित विषयाच्या संदर्भात प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीच्या अध्यक्षाकडून खुलासा मागविण्यात आला आहे.
‘डिफेन्स बजेटिंग’ कोणत्या अभ्यासक्रमाचा विषय?
एकीकडे विद्यापीठाने संबंधित विषयाच्या समितीच्या अध्यक्षांकडून खुलासा मागविल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी, “डिफेन्स बजेटिंग’ हा विषय कोणत्या अभ्यासक्रमाचा आहे हे विद्यापीठाने अद्याप स्पष्ट केले नसल्याचे दिसून येत आहे.