पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा ५६६ कोटी जमेचा आणि ६४८ कोटी खर्चाचा अर्थसंकल्प अधिसभेत सादर केला. हा तुटीचा अर्थसंकल्प असून, ही तूट ८२ कोटींवर गेली आहे.
विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा शनिवारी झाली. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिसभेला प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे आदी उपस्थित होते. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात विद्यार्थीविषयक सेवा व सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रम, उपकेंद्रांचे बांधकाम यावर विशेष तरतूद आहे. संशोधन प्रकल्प प्रसिद्धी, नावीन्यता जागरूकता योजना, बौद्धिक संपदा हक्क, यावर अर्थसंकल्पात तरतूद आहे.
अर्थसंकल्पात विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ करण्यात आली. या शिष्यवृत्तीत १ कोटी ८५ लाखाने रक्कम वाढविण्यात आली आहे. यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्थसहाय्य योजना, महात्मा ज्योतीराव फुले अर्थसहाय्य योजना, स्वामी विवेकानंद अर्थसहाय्य योजना, क्रांतिज्योती सावित्रीबाफ फुले अर्थसहाय्य योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज अर्थसहाय्य योजनांचा समावेश आहे. विद्यापीठात नव्याने बांधकाम होणार नसून, पूर्वीपासून जी बांधकामे सुरू आहेत, ती पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी एकूण ५८ कोटी व इतर सुविधा, सुधारणांसाठी १३ कोटींची तरतूद केल्याचे शिंगणापूरकर म्हणाले.
ऍनिमल हाउस बांधकामासाठी ३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे. संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी चौदा मजली संशोधन विद्यार्थी वसतिगृहाच्या दोन स्वतंत्र इमारती बांधण्यात येत असून, प्रत्येक वसतिगृहात ५१३ विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था होणार आहे.
विद्यापीठातील पाणीपुरवठा योजना अधिक सक्षम व नियोजनबद्ध करण्यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. विविध विभागात लिफ्ट बसविण्यासाठी २५ लाख प्रस्तावित आहेत. विद्युतीकरण सक्षम करण्यासाठी १ कोटींची तरतूद, तसेच विद्यार्थी विकास मंडळाच्या देखभाल व विकासासाठी १२ कोटी ९६ लाख रुपये, तर कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजनेसाठी ७ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.