पुणे – पदवीचे शिक्षण घेत असलेल्या आणि प्रशासकीय सेवेत करिअर करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत तीन वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरु केला आहे. यासाठी यंदाच्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्जासाठी अंतिम तारीख 10 ऑक्टोबरपर्यंत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतील. मुख्य म्हणजे हा अभ्यासक्रम ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने असेल.
विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांवर त्यांना प्रवेश दिला जाईल. यामध्ये 80 टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाइन माध्यमातून आणि उर्वरित 20 टक्के ऑफलाइनच्या माध्यमातून शिकवला जाणार आहे. करोना पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हा अभ्यासक्रम शिकवला जाणार असल्याची माहिती स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे देण्यात आली.
या अभ्यासक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीन पातळ्यांवर तयारी करून घेण्यात येईल.
या अभ्यासक्रमाद्वारे लेखन सराव, व्यक्तिमत्व विकास, इंग्रजी भाषेवर प्राविण्य मिळवण्याकरिता कार्यक्रम, वादविवाद कार्यक्रम, चर्चासत्र, वेबिनार या सर्वांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता बांधणी केली जाणार आहे. सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.