परदेशी विद्यार्थ्यांमध्ये करोनाबाबत जनजागृती : महाविद्यालयांनाही सूचना
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये करोनाबाबत जनजागृती केली जात आहे. त्याबाबत विद्यापीठाने महाविद्यालयांना सूचित केले आहे. करोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी सुरक्षेसाठी पाऊल उचलले आहे.
देशात करोनाच्या प्रसारावर प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. पुणे विद्यापीठानेही परदेशी विद्यार्थ्यांचे केंद्र असलेल्या पुण्यातही सुरक्षिततेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या प्रवेशद्वारावर करोना संदर्भात काळजी घेताना काय करावे, काय टाळावे याची माहिती लावण्यात आली. प्रवेशद्वारावर हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना करोनाची सर्व माहिती देण्यात आली.
परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीशी भेटण्यास गेल्यानंतर हस्तांदोलन, गळाभेट टाळाच अशा सूचना दिल्या आहेत. भारतातील स्थिती सामान्य असल्याचेही त्यांच्या पालकांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी दिली.
सध्या पुण्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे ते स्वदेशात जाणार नाहीत. येत्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असल्याने ती पूर्ण होऊन, जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर नवे प्रवेशित विद्यार्थी पुण्यात येतील. तो पर्यंत “करोना’चा प्रभाव कमी झाला नाही तर प्रवेशास मुदतवाढ दिली जाईल, असेही डॉ. खरे म्हणाले.
विद्यार्थ्यांना सूचना
वारंवार हात स्वच्छ धुवा
अस्वच्छ हात चेहऱ्याला लावू नका
संवाद साधताना व्यक्तीपासून अंतर ठेवा
आजारी असल्यास त्वरीत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्या
मास्कचा वापर करा