पुणे विद्यापीठाची विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना “सेवा हमी’

मोबाइल ऍपद्वारे मांडता येणार तक्रारी : अडचणींवर तत्काळ उतारा

पुणे  – विद्यापीठ वसतिगृह आणि विभागात शिकणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शैक्षणिक, प्रशासकीय विभाग, प्राध्यापक, कर्मचऱ्यांना ठराविक मुदतीत उत्कृष्ट सेवा तातडीने देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मोबाइल ऍप सुरू करणार आहे. येत्या दोन दिवसांत याचे उद्‌घाटन होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार प्रशासनाकडून तत्काळ सेवा मिळणार आहे.

वसतिगृहात फॅन, गिझर बंद पडले, शैक्षणिक व प्रशासकीय विभागात पाण्याची व्यवस्था नाही, वीज व दूरध्वनी सेवा बंद अशा तक्रारी विशेषत: स्थावर विभागाकडे येतात. त्यानंतर वेळेनुसार त्या सुविधा पुरवल्या जातात. मात्र, योग्य वेळेत सुविधा मिळत नसल्याचे म्हणणे आहे. नेमक्‍या तक्रारी काय, यावरून स्थावर विभाग व विभागप्रमुख यांच्यात समन्वय नसतो. त्यामुळे वेळेत सुविधा मिळत नाही.

या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने मोबाइल ऍप सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ऍपवरून विद्यापीठातील कोणत्या विभागास काय हवे आहे, काय दुरुस्त करावयाचे आहे याची माहिती छायाचित्रासह देता येईल. त्यानंतर ही तक्रार संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांकडे जाईल. त्यांनी दोन दिवसांत त्या तक्रारीवर कार्यवाही करणे अपेक्षित आहे. ती न झाल्यास संबंधित तक्रार वरिष्ठांकडे जाईल. वरिष्ठांनी तक्रारीची दखल घेतली नाही, थेट कुलसचिवांकडे ही तक्रार प्राप्त होईल. परिणामी, विद्यापीठाच्या कारभारात पादर्शकता येणार आहे.

कुलसचिवांकडून वसतिगृहाची झाडाझडती
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी शनिवारी अचानकपणे मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. त्यापूर्वी मुलींनी वसतिगृहात योग्य वेळेत सुविधा उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली होती. वॉटर प्युरिफायर, नादुरुस्त गिझर, वाचन कक्ष रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवावा आदी मागण्या होत्या. त्यावर मुलींनी कुलसचिवांसमोर वस्तुस्थिती मांडली. तक्रारीची शहानिशा करत त्या रास्त असून, त्यावर तातडीने सुविधा देण्याचे आदेश कुलसचिवांनी स्थावर व सुरक्षा विभागाला दिले. तर, दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

विद्यापीठ कॅम्पसवरील विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही तक्रार करण्यासाठी मोबाइल ऍप सुरू करण्यात येणार आहे. त्यावर संबंधितांकडून काय कार्यवाही झाली, याची माहिती अथवा तशी यंत्रणा निर्माण होईल. त्यामुळे कोणी काय तक्रार केली अथवा काय उपायोजना केली, त्याचे रेकॉर्ड राहील. परिणामी, प्रश्‍न तातडीने मार्गी लागेल.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू

Leave A Reply

Your email address will not be published.